- पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांची थकबाकी 2359 कोटींवर
ऑनलाईन टीम / पुणे :
वारंवार आवाहन करूनही वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीतील 47 लाख 30 हजार 900 वीजग्राहकांकडे तब्बल 2359 कोटी 13 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा अद्यापही सुरु ठेवण्यात आला आहे. परंतु थकबाकीमुळे महावितरणवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी चालू वीजबिलांसह थकबाकीचा भरणा करावा असे कळकळीचे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत तीन महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीतील थकबाकीदारांच्या संख्येत तब्बल 14 लाख 90 हजार 300 ग्राहकांची भर पडली असून थकबाकी देखील 693 कोटी 2 लाखांनी वाढली आहे. सद्यस्थितीत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये 47 लाख 30 हजार 900 वीजग्राहकांकडे 2359 कोटी 13 लाख रुपयांची थकबाकी आहे.पुणे जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीमध्ये गेल्या तीन महिन्यांत 9 लाख 9 हजार थकबाकीदारांची व 399 कोटी 41 लाख रुपये थकबाकीची रक्कम वाढली आहे.
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील या अकृषक 23 लाख 81 हजार 400 वीजग्राहकांकडे 1329 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ, देखभाल व दुरुस्ती, इतर खर्च भागविण्यासाठी तसेच अन्य देणी देण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.








