केंद्रीय कोळसामंत्र्यांचा लोकांना दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोळशाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नजीकच्या काळात वीजेची कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही. यासंबंधी जी वृत्ते सोशल मिडियावरुन किंवा वृत्तपत्रांमधून प्रसारित करण्यात येत आहेत, ती पूर्णतः निराधार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी केले.
वीजनिर्मिती केंद्रांच्या मागणीनुसार त्यांना कोळसा पुरविला जाईल. देशात कोळशाचे विपुल साठे असून वाहतूक यंत्रणाही सज्ज आहे. सध्या विविध वीजनिर्मिती केंद्रांमध्ये 72 लाख टन कोळशाचा साठा आहे. तो चार दिवसांसाठी पुरेसा आहे. कोल इंडियाकडे 4 कोटी टन कोळसा असून तो केंद्रांना पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात सप्टेंबर पर्यंत वीजेच्या उत्पादनात तब्बल 24 टक्के वाढ झाली आहे. कोळशाचा विपुल पुरवठा हे त्याचे कारण आहे. वीजकेंद्रांची प्रतिदिन कोळशाची आवश्यकता 18.5 लाख टन इतकी आहे. तर प्रतिदिन कोळशाचा पुरवठा सध्या 17.5 लाख टन इतका आहे. त्यामुळे वीजनिर्मिती पुरेशा प्रमाणात होत असून वीजकपात मोठय़ा प्रमाणावर होणार असल्याची वृत्तेs निराधार असल्याचे स्पष्टीकरण जोशी यांनी दिले.
निर्यात घटविली गेल्या दोन वर्षांमध्ये भारताने योजनाबद्ध रितीने कोळशाच्या आयातीवरचे अवलंबित्व कमी केले आहे. देशातंर्गत कोळसा उत्पादन वाढवून आयात मोठय़ा प्रमाणात कमी केली आहे. त्यामुळे अचानक निर्माण होणाऱया कोळसाटंचाईवर मात करणे शक्य होत आहे. देशातील कोळशाचा साठय़ाचा नियोजनबद्ध उपयोग करण्याचे सरकारचे धोरण आहे, असेही प्रतिपादन जोशी यांनी केले.









