तिसऱया दिवशीही पडझड दुरुस्तीचे काम सुरुच80 टक्के वीजपुरवठा पुर्ववत : आज रात्रीपर्यंत होणार शंभर टक्के पुरवठा
प्रतिनिधी / पणजी
गेल्या शनिवार व रविवारी मुसळधार पावसासह गोव्यात झालेल्या चक्रीवादळाचा सर्वाधिक मोठा फटका वीज खात्याला बसला असून खात्याचे रु. 25 कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता बरीच आहे. दरम्यान राज्यातील खंडीत झालेला 80 टक्के वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा वीज खात्याने केला असून उर्वरित 20 टक्के पुरवठा बुधवारी रात्रीपर्यंत सुरळीत होणार असल्याची माहिती वीज खात्याने दिली आहे. अजूनही अनेक गावे विजेविना अंधारात असून विजेवर अवलंबून असणारा पाणीपुरवठा पूर्ववत झालेला नाही. वीज, पाण्याविना अजूनही काही भागात लोकांचे हाल सुरु आहेत.
चक्रीवादळाचे दुष्परिणाम अजूनही काही गावात चालू असून पाण्यासाठी दाहीदिशा अशी तेथील लोकांची परिस्थिती बनली आहे. विहिरी, ओहोळ, झरी येथील पाण्याचा वापर करून लोकांनी कसे बसे दिवस काढले असून रात्री त्यांच्या नशिबी अजूनही अंधाराच आहे. त्यातून सुटका होण्याची प्रतीक्षा तेथील लोक करीत आहेत.
जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
चक्रीवादळामुळे ठप्प व विस्कळीत झालेले गोव्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून झाडे पडल्याने बंद झालेले बहुतेक रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. रस्त्यावरील झाडे, फांद्या, पानांचा कचरा हटवण्यात येत असून इतर वस्तूंचा कचरा मात्र तसाच आहे. अनेक घरांचे, दुकानांचे पत्रे, फलक व इतर बोर्ड मोडून फुटपाथ, रस्त्याच्या कडेला पडलेले असून ते अजून हटविण्यात आलेले नाहीत. संबंधित पालिका, पंचायतीनी अद्याप त्याची दखल घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे.
कर्मचारी, अधिकाऱयांचे युद्धपातळीवर काम
चक्रीवादळाने वीज खात्याचे मोठे नुकसान केले असून वीजपुरवठा पूर्ववत व्हावा म्हणून खात्याचे कर्मचारी, अधिकारी 24 तास सातत्याने राबत आहेत. त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवार रात्रीपर्यंत संपूर्ण गोव्यातील वीज प्रवाह सुरळीत होणार असल्याचे खात्याच्या सुत्रांनी सांगितले.
पाणी नसल्याने लोक हैराण
वीज, पाणी नसल्याने लोक हैराण झाले असून पावसामुळे थोडा थंडावा निर्माण झाल्याने गरमीने त्रस्त झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला असला तरी हालात भर पडल्यामुळे लोक त्रस्त आहेत. वीज, पाणी नसल्याने घरात स्वयंपाक करणे अनेकांना अवघड बनले असून त्यांनी जवळपासच्या हॉटेलातून काहीतरी अन्न पदार्थ, पाणी आणून कशीबशी तहान भूक भागवली आहे.
विजेचे 1 हजार खांब, 50 ट्रान्सफॉर्मर, टॉवर्स कोसळले
वीज खात्याचे विविध गावातील मिळून एकूण 1000 पेक्षा जास्त वीज खांबांचे मोठे नुकसान झाले. कंडक्टर्सची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. सुमारे 50 पेक्षा ट्रान्स्फॉर्मरना मोठा फटका बसला असून ते सर्व बदलणे ही कामे सातत्याने चालू आहेत. अनेक वीजवाहिन्या तुटल्या असून त्यांची पुन्हा जोडणी करण्याचे काम सुरू आहे. वीज खात्याचे 33 केव्ही क्षमतेचे 5 टॉवर्स वादळाने मोडले असून ते पुन्हा बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा देखील प्रभावीत झाली असून ती पूर्ववत होण्याची वाट पाहिली जात आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी तेथे पुन्हा पुन्हा खंडित होण्याचे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे.
अग्निशामक दलाच्या कार्यक्षेत्रात राज्यभरात 1.11 कोटीचे नुकसान

राज्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे अग्निशामक दलाच्या कार्यक्षेत्रात येणारे 1.11 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज अग्निशामक दलाने वर्तविला आहे. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस अग्निशामक दलात 1 हजार 387 फोन कॉल्स आले होते. एकूण 15 अग्निशामक केंद्रांचे कर्मचारी तीन दिवस काम करीत असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
ठिकठिकाणी मोठमोठय़ा झाडांची पडझड झाल्यामुळे अनेक रस्ते बंद झाले होते. रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यास दलातर्फे प्राधान्य देण्यात आले होते. राज्यातील जवळजवळ सर्व रस्ते मोकळे करण्यात आले आहे. काही ठिकाणी घरावंर झाडे पडून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांवरील झाडे काढण्यासही अग्निशामक दलाच्या जवानानी दिरंगाई केली नाही. एकूणच गेले तीन दिवस अग्निशामक दलाच्या जवानांनी दिवसरात्र काम करून आपले कर्तव्य चोख बजावले आहे.
हवामान खात्याच्या इशाऱयानुसार अग्निशामक दलाने वादळाच्या तडाख्याला खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी योग्य ती तयारी अगोदरच करून ठेवली होती. साधनसुविधा तसेच यंत्र सामुग्रीसह अग्निशामक दलाचे सर्व जवान सज्ज राहिले होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य योग्यरित्या करणे शक्य झाले.









