धारगळ येथील घटना : खांबावरील जीर्ण उपकरण तुटल्याने अपघात : वीज खात्याचा हलगर्जीपणा
पेडणे / प्रतिनिधी
वीज खांबावर चढण्याचे उपकरण तुटून खांबावरून पडून गंभीर जखमी झालेले वीज खात्याचे लाईनमन सुभाष वसंत अमेरकर (52) यांचा मंगळवारी रात्री गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी सुकेकुळण धारगळ येथे घडली होती. दरम्यान, कर्मचाऱयांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करणाऱया पेडणे वीज खात्याच्या संबंधित अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, खारेबांध येथील लाईनमन सुभाष अमेरकर हे मंगळवारी सुकेकुळण धारगळ येथील 33 केव्ही दबाच्या वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेले होते. वीज खांबावर चढण्यासाठीच्या उपकरणाने ते सुमारे नऊ मीटर उंचीच्या खांबावर चढले. यावेळी त्यांनी बंद असलेल्या वीज वाहिनीला पकडले असता खांबाला जोडलेले उपकरण जीर्ण झाल्याने तुटले त्यामुळे अमेरकर खांबावरून जमिनीवर पडले. यात त्यांच्या छातीचे बरगडे तुटले. त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात नेण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला.
सुभाष अमेरकर यांच्या पश्चात वसंत (12) व नवीन (8) ही मुले व पत्नी
प्रफुल्ल असा परिवार आहे. सुभाष अमेरकर यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पेडणे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुंटुबियांच्या ताब्यात देण्यात आला. काल दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपनिरीक्षक संजित कांदोळकर पंचनामा केला.
पेडणे वीज कार्यालयाचा हलगर्जीपणा
पेडणे तालुक्मयात उच्च दबाच्या वीज वाहिन्या व खांब्यावरील साहित्य गजलेले असून गेली अनेक वर्षे वीज खात्याने याकडे लक्ष दिले नाही. 33 केव्ही वीज वाहिन्या जात असलेल्या लोखंडी खांब व त्याला जोडलेली उपकरणे ही गेली अनेक वर्षे डागडुजी न केल्याने गंजून गेली आहेत. त्यामुळे कर्मचाऱयांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.
संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
पेडणे वीज कार्यालयातील संबंधित अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे सुभाष अमेरकर यांचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. एका महिन्यापूर्वीच धागरळ येथील वीज ट्रान्स्फार्मर येथे वीज वाहिनीचे काम करण्यासाठी चढलेल्या एका कर्मचाऱयाला वीजेचा धक्का लागून तो खांबावरच अडकून पडल्याची घटना घडली होती. सुदैवाने तो कर्मचारी उपचारनंतर वाचला होता. यावरून कर्मचाऱयांच्या सुरक्षेबाबत वीज विभागाचे झालेला हलगर्जीपणा समोर आला आहे. मंगळवारच्या घटनेबाबात पेडणे पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद केला नव्हता. या घटनेला जबाबदार असणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.









