पालिकेत अधिकाऱयांना दिल्या नियुक्त्या
प्रतिनिधी/ सातारा
गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. गणेशोत्सवावेळी दरवर्षी विसर्जनाची समस्या साताऱयात भेडसावत होती. चार वर्षापासून प्रतापसिंह शेती शाळेच्या जागेत मोठया गणेशमूर्ती विसर्जनकरता तळे फिक्स करण्यात आले आहे. याही वर्षी त्याच तळय़ामध्ये विसर्जन करण्याकरता पालिकेच्यावतीने कामाला सुरुवात झाली आहे. पालिकेच्यावतीने विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेच्यावतीने विसर्जनाची व गणेशोत्सवाच्या नियोजनाकरता नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.
सातारा शहरात पुर्वी मंगळवार तळय़ामध्ये विसर्जन होत होते. परंतु सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर तेथील विसर्जन बंद करण्यात आले. त्यानंतर विसर्जनाकरता सातारा पालिकेने ऐनवेळी प्रतापसिंह शेती शाळेच्या जागेत तात्पुरते दोन वर्ष तळे खोदले होते. तळे खोदून तेथे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर सातारा जिल्हा परिषदकडून त्या जागेस विरोध होवू लागला. परंतु सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे खासदार उदयनराजे यांनी या प्रश्नी तोडगा काढण्याची विनंती केली तेव्हा प्रतापसिंह शेती शाळेच्या पूर्व बाजूची जागा देण्यात आली. तेव्हापासून तेथेच तळे काढलेले असून त्याच तळयात गणेशमूर्ती व दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. याच विसर्जन तळय़ाच्या ठिकाणी कामाची तयारी सुरु करण्यात आली असून दरम्यान, सातारा पालिकेमध्येही अधिकाऱयांनाही नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.









