सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राजवाडा परिसरात अज्ञातांकडून भटक्या कुत्र्यांना विष घालून मारण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत जवळपास साते ते आठ कुत्र्यांना आपला जीव गमवावा लागला. प्राणीप्रेमींनी या प्रकाराचा कडाडून निषेध करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याबाबत नगरपालिकेकडेही वेळोवेळी या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहिम हाती घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे, पण नगरपरिषदेने याकडे कानाडोळा केला. मंगळवारी कुत्र्यांना विष घालून मारण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रात्री आळूच्या खड्डय़ाकडून प्रतापगंज पेठेकडे जाणाऱ्या वाहनतळाच्या पुलालगत दोन कुत्री मृतावस्थेत आढळून आली. पुढील पाऊण तासात पालिकेच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या दारात आणखी एक कुत्रे मरणासन्न अवस्थेत आढळून आल्याने हा अज्ञाताकडून विष प्रयोग झाल्याचा संशय बळावला. साताऱ्यात भटक्या प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या व्ही केअर संस्थेला या प्रकरणाची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तत्पूर्वी सात ते आठ कुत्र्यांचा मृत्यू झाला होता.
संस्थेच्या सदस्या जस्मीन अफगाण म्हणाल्या, भटक्या कुत्र्यांवर झालेला विष प्रयोग हा प्रकार नियोजित आहे. दोन दिवसापूर्वी मंगळवार तळे परिसरात सुध्दा काही भटक्या कुत्र्यांना विष घालून मारण्याचा प्रकार समोर आला असून, ही घटना निषेधार्थ आहे. या प्राण्यांच्या पुनर्वसनाचे काही वेगळे नियम असून स्थानिक स्वराज्य संस्था व प्राणीप्रेमी संघटनांनी समन्वयातून एक निश्चित धोरणं ठरवायला हवे.









