‘वसुधैव कुटुंबकम’ अथवा ‘हे विश्वचि माझे घर’ हा विचार भारतीयांनी प्राचीन काळीच जगाला दिला. भारताने तत्त्वज्ञान, अध्यात्म, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, शस्त्रास्त्रविद्या, राजनीती आणि वाङ्मय या क्षेत्रामध्ये कित्येक शतकांपूर्वी आश्चर्यकारक प्रगती केली होती आणि ज्ञानाचा प्रकाश साऱया विश्वाला दाखवला. मानवजातीचे वैचारिक प्रबोधन करण्यात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या आपल्या देशाने रात्रीच्या अंधकाराला दूर करणाऱया दिव्यांच्या प्रकाशाचा उत्सवही जगाच्या कानाकोपऱयातील लोकापर्यंत पोहोचवला.
दीपावली हा भारतीयांचा, देशभर उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण. तसे भारतीय लोक वर्षभर सण उत्सवात गुंतलेले असतात. परंतु दीपावलीमध्ये रात्रीचा अंधकार दूर करणारे दिवे प्रज्वलित केले जातात. खिशातील रिकामपण भरून काढणारा पैसा हाती खुळखुळू लागतो, पावसाने केलेला राडारोडा वाळलेला असतो आणि उन्हाने होणारी जिवाची काहिली अद्याप दूर असते. अशा वातावरणात गुलाबी थंडीच्या दिवसात दीपोत्सव येतो. भारतीय पंचांगानुसार ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात येणारा हा उत्सव भारताबाहेरही अनेक देशांमध्ये मोठय़ा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
जगाच्या नकाशावरून सहज नजर फिरवली तर दिसणाऱया ब्रिटन, अमेरिका, द†िक्षण आफ्रिका, इंडोनेशिया, नेपाळ, मलेशिया इत्यादी देशांमध्ये भारताप्रमाणे दिवाळीचे पाच दिवस मोठय़ा धामधुमीने पार पडतात. या काळात एक दिवस तरी सुट्टी दिली जाते आणि भारतीयांबरोबरच त्या-त्या देशांतील नागरिक दीपोत्सवाचा आनंद लुटतात. ब्रिटन आणि अमेरिका हे ख्रिश्चन धर्मीयांचे देश. नाताळ हा डिसेंबरात येणारा ख्रिस्ती सण तिकडे फार धूमधडाक्यात साजरा होतो. पण भारतीयांचे प्रमाण त्या देशांमध्ये बऱयापैकी आहे आणि नाताळपूर्वी येणारा ‘मिनी नाताळ’ वाटावा असा साज तिथल्या बाजारपेठांवर दिवाळीनिमित्त चढलेला दिसतो. ब्रिटनमध्ये जे परदेशी लोकांचे अल्पसंख्य समुदाय वास्तव्य करतात, त्यामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने भारतीय दुसऱया क्रमांकावर आहेत. दिवाळीच्या दिवसात तिकडे थंड, विशेष दमट आणि काहीसे वादळी वातावरण असते खरे, पण दिव्यांची रोषणाई फटाक्यांची आतषबाजी खाऊची रेलचेल आणि नव्या कपडय़ांची उढब यांनी तिथल्या वातावरणात चैतन्य सळसळू लागते आणि दीपावली येऊन जाते. इतक्यातच नाताळची चाहूल लक्षात येते.
अमेरिकेत वास्तव्य करणाऱयांमध्ये भारतीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. एका पर्यटनविषयक संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतीयांचा दीपोत्सव 1820 पासून अमेरिकेत साजरा होत आला आहे. म्हणजे यंदा अमेरिकेत दीपावलीचे द्विशतक म्हणायचे! या उत्सवाची लोकप्रियता तिकडे दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगत असणाऱया पॅलिफोर्नियातील डिस्नेलँड आणि पूर्वेकडील न्यूयॉर्कमधील ‘टाईम्स चौक’ यासारख्या पर्यटकांची गजबज असणाऱया ठिकाणी भारतीय पद्धतीने रंगरंगोटी केली जात़े म्हणजे विशाल आकाराच्या रांगोळ्या घातल्या जातात़ या रांगोळ्या, विविध प्रकारची मिठाई आणि विशेष म्हणजे पैशाची देवता लक्ष्मी हिचे पूजन या गोष्टीचे तिकडच्या लोकांना मोठेच नवल आणि कौतुक वाटत़े विशेष असे की 3 कोटी भारतीय अमे†िरकेत राहतात आणि राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आणि कार्यालय असणाऱया ‘व्हाइट हाऊस’चा परिसरही दीपावलीत उजळून निघावा इतपत प्रभाव त्यांनी त्या राष्ट्राच्या कारभारावर टाकला आह़े
दक्षिण अमे†िरकेच्या उत्तर किनारपट्टीवरील गियाना या देशाची एक तृतीयांश लोकसंख्या हिंदूंची आह़े गियानाच्या राष्ट्रीय पॅलेंडरमध्ये दीपावलीची अधिकृतपणे सुटी दाखवलेली असत़े 1853 साली भारतातून कंत्राटी मजुरांची पहिली तुकडी गियानामध्ये तत्कालीन ब्रिटीश राज्यकर्ते आणि भांडवलदारांनी नेल़ी ‘इंडेन्चर्ड लेबर’ या नावाने ओळखले जाणारे हे मजूर भारतीय वंशाचे असत़ भारतात गरीबी आणि सामाजिक विषमता यांनी गंजलेले आणि कंटाळलेले हे लोक ब्रिटीश गियाना, फिजी, मॉरिशस, त्रिनिदाद, टोबॅगो इत्यादी ठिकाणी मजूर म्हणून गेले आणि भारतीय समाजव्यवस्थेतील अनेक त्रासदायक रूंदीतून मुक्ती देणारी नवी व्यवस्था त्यांनी तिकडे निर्माण केल़ी मात्र भारतीय सण, देवदेवता, परंपरा, रीतीरिवाज, खाद्यपदार्थ या सर्वांना आपल्यासोबत तिकडे नेऊन त्यांनी त्या त्या देशांमध्ये छोटी छोटी भारतीय प्रतिरूपेच जणू तयार केल़ी
अशा प्रकारच्या कंत्राटी मजुरांनी दीपावलीची प्रथा सोबत नेली आणि काळाच्या ओघात त्यात झालेल्या बदलांसह ती टिकून राहिल़ी त्रिनिदाद, टोबॅगो, हमिंग बर्ड या पॅरेबियन समुद्रातील प्रदेशांमध्ये 40 ते 45 टक्के भारतीय राहतात़, त्यात प्रामुख्याने हिंदूंचा समावेश आहे. तिथेही दिवाळीची सुटी देण्यात येत़े मॉरिशस हे आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीजवळील बेट. येथेही दिवाळी साजरी होत़े मॉरिशसमधील 63 टक्के लोकसंख्या भारतीय वंशाची आणि त्यातील 80 टक्के हिंदू आहेत़ दक्षिण आफ्रिकेतदेखील मूळचे भारतीय असलेले हिंदू-मुस्लिम मोठय़ा संख्येने राहतात़ नाताळ आणि ट्रान्सवाल भागात त्यांची वस्ती एकवटली आह़े आनंदाने एकत्र येऊन दिवाळी साजरी करणाऱया या दक्षिण आफ्रिकन भारतीयांनी तेथील दीपोत्सवाची शताब्दी 2007 मध्ये पूर्ण केल़ी
भारताशेजारील नेपाळमध्ये दिवाळीत भारतासारखेच वातावरण असत़े परंतु विशेष असे की, 8 टक्के हिंदू असणारा मलेशिया आणि केवळ 2 टक्के अल्पसंख्य हिंदू असणारा इंडोनेशिया हे आग्नेय आशियाई देशही दिवाळीचा आनंद लुटतात, तेवढेच काय इस्लाम हा अधिकृत राष्ट्रीय धर्म असणाऱया आखाती प्रदेशातील दुबईमध्ये दीपोत्सव हा मोठा चैतन्याचा सण म्हणून ओळखला जातो आणि त्या आनंदात तेथील अरब बांधवही सहभागी होतात़ अशा या विश्वव्यापी दीपोत्सवावर यावर्षी कोरोनाचे अशुभ सावट पडले आहे. अमेरिकेत या रोगाने 2,40,000 बळी घेतल़े मोठय़ा संख्येने एकत्र येऊन समारंभ आयोजित करण्यावर सर्वत्र निर्बंध घालण्यात आल़े नृत्य गायनाचे शानदार समारंभ यावर्षी होऊ शकणार नाहीत़ त्या ऐवजी ‘ऑनलाईन’ माध्यमातून लोक परस्परांना शुभेच्छा देतील़ ‘टाइम्स स्क्वेअर’मधल्या शानदार दीपोत्सवात यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातूनच संगणकीय माध्यमातून दीप प्रज्वलन करतील, कदाचित ‘कोरोनातून’ बाहेर येण्याच्या नव्या युगाचा तो शुभारंभ असेल!
– राजेंद्रप्रसाद मसुरकर








