चेन्नई / वृत्तसंस्था
भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला लेजेण्डस् ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सलग चौथ्या पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. दीड लाख अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत आनंदला अजिबात सूर सापडलेला नाही. येथे त्याला नेदरलँडसच्या अनिश गिरीकडून 2-3 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
आनंद व गिरी यांच्यातील चार सामने ड्रॉ राहिले. त्यानंतर आर्मेगेडॉन (टायब्रेक) लढतीत गिरीने सनसनाटी विजय संपादन केला. आनंदने या इव्हेंटमधील पहिला गुण येथे प्राप्त केला. पण, गुणतालिकेत त्याचे शेवटचे स्थान जैसे थे राहिले. यापूर्वी, पहिल्या तीन फेऱयांमध्ये त्याला अनुक्रमे पीटर स्विडलर, मॅग्नस कार्लसन व ब्लादिमिर क्रॅमनिक यांच्याकडून पराभव स्वीकारावे लागले आहेत. तीच मालिका येथे अनिश गिरीविरुद्ध कायम राहिली.
चेन्नईस्थित आनंद हा मॅग्नस कार्लसन चेस टूर स्पर्धेत प्रथमच प्रतिनिधीत्व करत असून गिरीविरुद्ध पहिल्या लढतीत 82 व्या चालीअखेर त्याने बरोबरी प्राप्त केली. दुसरा डाव 49 चालीत बरोबरीत राहिला तर पुढील दोन डावही अनिर्णीतच राहिले. त्यानंतर टायब्रेक लढतीत गिरीने काळय़ा मोहऱयांसह सनसनाटी विजय मिळवला आणि दोन गुणांची कमाई केली. शनिवारी उशिराने आनंदची पाचव्या फेरीतील लढत हंगेरीच्या पीटर लेकोविरुद्ध होणार होती.
गुणतालिकेत मॅग्नस कार्लसनच्या साथीने संयुक्त आघाडीवर असणारा रशियाचा पीटर स्विडलर पाचव्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध 1.5-2.5 फरकाने पराभूत झाला आणि यामुळे कार्लसनचे 12 गुणांसह अव्वल राहिला. लिरेनचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. नेपोम्नियाची 11 गुणांसह दुसऱया स्थानी आहे. कार्लसनने इस्त्रायलच्या बोरिस गेलफंडला 3-0 असे पराभूत केले. या स्पर्धेतील सर्व सामने ‘बेस्ट ऑफ फोर’ पद्धतीने खेळवले जात आहेत.









