वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये भरविली जाणार आहे. दरम्यान कोरोना महामारी संकटामुळे या स्पर्धेचे भवितव्य अधांतरी राहिले आहे. आता या स्पर्धेच्या आयोजनाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया अंतिम निर्णय घेवू शकेल, असे वैयक्तिक मत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
सदर स्पर्धा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळविली जाणार आहे पण कोरोना महामारी संकटामुळे आयसीसीने अद्याप या स्पर्धेसाठी आपला अंतिम निर्णय घेतलेला नाही. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी हिरवा कंदील दाखविण्यात आलेला नाही. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्याची सक्ती राहील. स्टेडियममध्ये केवळ 25 टक्के शौकिनांना प्रवेशाची परवानगी दिली जाईल. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने या स्पर्धेसंदर्भात अंतिम निर्णय घेणे जरूरीचे आहे, असे तेंडुलकरने आज तक या वाहिनीशी बोलताना सांगितले.
येत्या जुलैमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱया विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे सचिनने स्वागत केले आहे. इंग्लंड आणि विंडीजच्या क्रिकेट मंडळानी सदर मालिका खेळविण्याचा निर्णय संयुक्तपणे घेतल्याबद्दल सचिनने या दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळाचे अभिनंदन केले आहे. इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील पहिली कसोटी 8 जुलैला सुरू होईल. कोरोना महामारीमुळे क्रिकेट क्षेत्रावर विपरित परिणाम झाला असून अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेविषयी अंतिम निर्णय घेताना थोडे अवघड जाईल, असे सचिनने सांगितले.









