भारतीय समाज आदर्श पुरुषांचा सदैव ऋणी असतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवराय असोत, घटनेचे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर असोत वा संतश्रे÷ बसवेश्वर वा बौद्ध असोत, त्यांचा आदर क्य़क्त करीत असतो. राजकीय नेते मग महात्मा गांधी, स्वा. वीर सावरकर, जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयीजी असोत त्यांच्या जन्मदिवशी त्यांचे स्मरण करीत असतो. कामगार क्षेत्र त्याला अपवाद नाही. राष्ट्र उभारणीच्या कामात कामगारांचे योगदान अमोल आहे. पैसा आहे म्हणून कोणताही भांडवलदार यशस्वी होत नाही. त्याच्या कल्पना अस्तित्वात आणण्यास कामगारांचे कष्ट अतिशय महत्त्वाचे असतात. त्यांचा पण आदर्श दिवस ज्यांनी आपल्याला एक दिशा दिली, त्याचे स्मरण तो दरवषी करीत असतो. एक मे या दिवशी कामगार दिन म्हणून जगात त्याचे स्मरण केले जाते. कामगारांचे प्रतिनिधी वा त्यांचे मार्गदर्शक अनेक राष्ट्रात वेळोवेळी होऊन गेले. कम्युनिस्ट विचारसरणी व कामगार क्षेत्र, यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. कामगारांच्या जीवनाला एक वेगळे वळण देणारे ते मैलाचे दगड आहेत. साहजिक एक प्रश्न मनात सदैव असतो. परकीय लोकांनीच कामगारांच्या जीवनाबद्दल, सुरक्षिततेबद्दल विचार केला की आपल्या पूर्वजांनीही त्याबद्दल काही विचार केला होता किंवा नाही?
खोलवर अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येते की, आज जे आम्हीच कामगारांचे कैवारी आहोत, असे सांगतात व कार्ल मार्क्स असो, स्टॅलिन, माओत्से तुंग यांचेच गुणगान गातात ते आपली परंपरा, देशातील विचारवंतांना विसरलेले दिसतात. कम्युनिस्ट क्रांतीचे सर्व जनक वंदनीय आहेत. परंतु आपले साहित्य काय सांगते? मला एक प्रसंग आठवतो. आदरणीय कै. जगन्नाथराव जोशींचे मित्र सर्व राजकीय क्षेत्रात होते. सर्वांशी मैत्रीचे नाते होते त्यांचे. जगन्नाथरावांचा मुक्काम बेळगावात असताना त्यांचा बालपणीचा मित्र कट्टर कम्युनिस्ट विचारसरणीचा होता. त्यांना भेटण्यासाठी संघ कार्यालयात आला होता. लेनिन, स्टॅलिन हेच कामगारांचे खरे हितचिंतक. तुमच्यात असे कुणी विचारवंत आहेत काय अशा गप्पा कोणतीही कटुता नसताना होत होती. चेष्टेने जगन्नाथराव त्याला म्हणाले, ‘तुझे कामगार क्षेत्रातील बाप जन्मायच्या आधी आमच्या महाराष्ट्रात एक कम्युनिस्ट संत होऊन गेला. त्याचे नाव संतश्रे÷ तुकाराम महाराज. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ हा विचार तुमच्या विचारांच्या आधी अनेक वर्षापूर्वी सांगून गेला. संत तुकारामांचा फोटो तुमच्या कार्यालयात लावा.’ त्यांचा मित्र मनापासून हसला.
कामगारांचा विचार करणारा एक महान विचारवंत आपल्या देशात जन्माला आला. त्याचे नाव विश्वकर्मा. त्यांनी कामगार विषयाबद्दल जे विचार मांडले आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत. प्राचीन वाङ्मयात उद्योगधंद्यांचा उल्लेख आपणास मिळतो. कमीर-लोहार, धातृ-धातु गाळणारा, कुलाल व कौलाल म्हणजे मातीची भांडी तयार करणारा, इशुकार-बाण तयार करणारा. वाय-विणकर त्याचबरोबर भरत काम करणाऱया स्त्रिया, विणकर स्त्रिया, यजुर्वेदात कातडी कमावणारे व अथर्व वेदात लोकरीचे कापड करणाऱयांचा उद्योग करणाऱयांचा उल्लेख आहे. त्यांना वेतन कशाप्रकारे द्यावे हे सुद्धा नमूद केले आहे.
रामायणात विणकामांचा धंदा उर्जितावस्थेत पोचला होता. विणकामात खास धागे वापरून तयार केलेला माल करणाऱया कामगारांना वेगळय़ा प्रकारचे वेतन दिले जावे, असा उल्लेख आहे. महाभारतात रेशीम वस्त्रांचा उल्लेख आहे. अत्यंत बारीक रेशमी धाग्यांची वस्त्रे विणली जात. याचा उल्लेख मेगेस्थेनिसच्या प्रवासवर्णनात आहे. तो म्हणतो, ‘अशा वस्त्रात सोन्याच्या तंतुंचा आणि मूल्यवाल खडय़ांचा उपयोग केला जातो. अत्यंत पातळ मलमलीवर फुले वगैरे विणलेल्याचा उल्लेख आहे.’ बुद्ध काळाचा अभ्यास केला असता हस्तीदंताच्या कलाकुसरी होत असत. शिवाय शिल्प कला, वास्तुशास्त्र, चर्मकला, रंगकाम चांगलेच प्रगत होते. प्राचीन वाङ्मयात ‘भृती’ हा शब्द पगार वेतन या अर्थाने वापरत असत.
पाणिनी यांनी वेतन तीन प्रकारचे असावे, असा उल्लेख केला आहे. केलेल्या कामाच्या मापावरून, काम केलेल्या वेळेवरून, आणि काळ व काम या दोन्हीवरून वेतन ठरवून दिले होते. कौटिल्य म्हणतो, पूर्वी न ठरवता शेतातील रक्षक, गुराखी, वा मुकादम यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात वेतन व त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा कामगारांना द्यावा. शुकनीत माता पिता व अवलंबिताना पोसण्याइतके वेतन दिले पाहिजे, असा दंडक होता. केलेल्या कामाबद्दल प्रतिवषी ‘पारिपोष्यम’ म्हणजे बोनस दिला जावा असा उल्लेख आहे. ज्याची नोकरी चाळीस वर्षे झाली आहे त्याच्या पगाराच्या अर्धी रक्कम तो जिवंत असेपर्यंत द्यावी, आणि त्याच्या मृत्यूनंतर पेन्शन निम्मी द्यावी, काम करताना मृत्यू झाल्यास त्याचा मुलगा मोठा होईपर्यंत त्याच्या पत्नीस तेवढाच पगार द्यावा व मुलगा मोठा झाल्यावर त्याला नोकरी द्यावी असा नियम होता. या सर्वांचा, श्रमाची देवता म्हणजे ‘विश्वकर्मा’. गेल्या दि. 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंती होती.
भारतीय मजदूर संघाचा विचार
म्हणून एक मे हा आपला कामगार दिन नसून विश्वकर्मा जयंती हा कामगार दिन असावा, असा भारतीय मजदूर संघाचा विचार आहे. माझ्या माहितीप्रमाणे टाटा उद्योग समूहात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. आपल्या येथील शेकडो वर्षाची गुलामगिरी आणि त्यामुळे आमच्या समाज जीवनातून ‘स्व’देशीला मिळालेला खो हे आहे. आपल्याकडे मालक मजूर हा भेद नाही. न्हावी, चांभार, लोहार, कोष्टी, शेतकरी, वैद्य हे श्रमिक आहेत. परंतु स्वत:च मालकपण आहेत. कम्युनिस्टांचे ‘हॅव्हन व हॅव्हज नॉट’ तत्त्वज्ञान त्यांनी फोल ठरविले आहे. कंटाळा आला, आराम करतोय. त्यांना कोण अडवणार?
समुद्रावर सेतू बांधणाऱया नलाला रामानी विश्वकर्मा असे संबोधिले आहे. शंकराच्या आज्ञेवरून विश्वकर्माने आठ मजली इमारत बांधली होती. द्वारका, अलकापुरी, खांबावर उभी केलेली श्रीपुरीनगरी, पार्वतीच्या विवाहासाठी भव्य मंडप, कृष्णासाठी वृंदावन, रावणासाठी लंका देखील यांनीच निर्माण केली असा उल्लेख वाङ्मयात आहे. अशा या थोर कामगार नेत्याला सविनय दंडवत.
शारदाचरण कुलकर्णी, बेळगाव








