3 डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने…
विशेष मुलाच्या घरच्या पातळीवर किंवा सामाजिक पातळीवरील अस्वीकार मुलाला त्याच्या ‘संवादक्षमता’ कमी असल्याने ‘आक्रमक’ करतो. त्यामुळे मूल व समाज यातले अंतर वाढत जाते. हे टाळण्यासाठी पालकांनी ज्यांना आपले मुल व त्याच्या अक्षमतांची जाण आहे. तसेच मुलांच्या आजूबाजूला असलेल्या समाजाचीही जाण आहे त्यांनी ‘संवाददाता’ होऊन व संवादाद्वारे इतरांना माहिती देऊन ‘विशेष मुलांचा सामाजिक स्वीकार वाढवावा’. हे कृतीशील साधन प्रत्येकाने हाती घेतले पाहिजे.
मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये निरनिराळय़ा पातळीचे मतिमंदत्व असलेली मुले असतात. त्यांना वर्गांमध्ये वयानुसार न विभागता त्यांच्या क्षमतेनुसार बसवतात. त्यांना जमतील अशा गोष्टी शिकवतात. अभ्यासक्रमाऐवजी रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशी कामे शिकवतात. मुलांना आपल्या पायावर उभे राहावे असा प्रयत्न करतात.
यामध्ये एक भाग आपण पाहणार आहोत. ‘शिस्त लावणे’ म्हणजे ‘वागण्याची पद्धत शिकवणे’ असते. हे शिकणे मुलाच्या जन्मापासून सुरु होते जसे ठराविक वेळेला दुध देणे, कपडे बदलणे, इ. विशेष मुलेही स्वतः इतरांसारखीच असतात पण त्यांच्या गरजा विशेष असतात. विशेष गरजांमुळे त्यांना काही मर्यादा असतात. त्यामुळे त्यांना वेगळय़ा पद्धतीने शिकवावे लागते. बऱयाच बाबतीत जोडय़ा लावून शिकवल्यास, शिकवणे व शिकणे सोपे जाते. उदा. चांगली कृती केल्यावर स्टार्स(ङ) देणे, अपेक्षित गोष्ट केली नाही किंवा चुकीची केली तर त्या मुलाची आवडती गोष्ट न करणे (आवडती भाजी न करणे). असे केल्याने ‘आपण चांगले वागलो की आपल्याला आवडते तसे घडते’ हे मुलाच्या मनावर ठसते व तो ‘चांगले वागायला’ प्रोत्साहित होतो.
मतिमंदत्व असलेल्या मुलांमध्ये विचार नियंत्रण कमी असल्याने ‘अधीरेपण’ जास्त असते. ती ‘सुख’ तत्वानुसार चालतात. हवे ते मिळवण्यासाठी आक्रस्ताळेपणा करतात. आँटिस्टिक मुलांमध्ये संवेदनासंबंधी प्रश्न असतात.
उदा. काहींना आवाज नको वाटतात. ती मुले आवाजाच्या जागेपासून दूर जायला बघतात किंवा स्वतः दुसरा मोठा आवाज करतात. मुलांचे हे वागणे हे पालकांना ‘वागण्यातील प्रश्न’ वाटू शकतात. शिस्त लावताना पालकांनी आपले मूल असे का वागते आहे हे समजून घेतले
पाहिजे.
मुलाच्या अयोग्य वागण्याला शिक्षा व योग्य वागण्याला बक्षीस असावे. शिक्षा व बक्षीस हे वस्तू स्वरुपात, सामाजिक (चारचौघात कौतुक), भावनिक स्वरुपात असू शकते. अन्नपदार्थ देणे/न देणे कधीही बक्षीस/शिक्षा म्हणून वापरू नये. प्रत्येक मूल वेगळे असते. त्याच्या आवडीनिवडी व त्याचा त्यांचा प्राधान्यक्रम वेगळा असू शकतो. म्हणून पालकांनी आपल्या मुलाच्या आवडी विचारात घेऊन मुलाला काय बक्षीस द्यायचे ते ठरवावे. आपल्या मुलाची समज लक्षात घेऊन त्या क्षमतेचेच बक्षीस द्यावे. मुलाच्या मनात त्याचे वागणे व त्यानुसार त्याला मिळणारी शिक्षा/बक्षीस हे समीकरण दृढ होण्यासाठी शिक्षा/बक्षीस कृतीनंतर लगेचच द्यावे व ते प्रत्येक कृतीच्या वेळी द्यावे. पालकांना वाटणारी ‘शिक्षा’, मुलाच्या वयानुसार व त्याची ‘समज’ नुसार मुलाला ‘गंमत’ वाटू शकते याचा विचार पालकांनी शिक्षा ठरवताना करावा.
पालकांनी शिस्त लावताना काळजी घेतली पाहिजे. मुलाला शिक्षा कशासाठी केली आहे ते मुलाला सरळ व स्पष्ट शब्दात सांगायला हवे व त्याला ते कळले आहे हे पाहायला हवे. रागाच्या भरात उपरोधिक भाषा वापरल्यास, त्याला ती न कळल्याने, त्याच्या मनात असलेल्या ‘वागणे व शिक्षा’ ह्या समीकरणात गोंधळ उडेल. मुलाला कृती शिकवताना मुलाला काय करायचे ते एका वेळेला एक सूचना देत, सोप्या, सकारात्मक व ठराविक शब्दात सांगावे. वेळ लागला तरी ती गोष्ट मुलालाच करू द्यावी. घरातल्या सर्वांनी सूचना देतांना ठरवलेले शब्द/वाक्मये वापरावी. कारणापरत्वे मुलाला लावलेल्या सवयीमध्ये बदल आवश्यक ठरतो. परंतु विशेष मुलांना ते बदल करणे नकोसे वाटत असते. त्यामुळे त्यांना ते बदल शिकण्यासाठी पुरेसा अवधी द्यावा लागतो.
मुलांना शिस्त लावताना कुटुंबातील सर्वजण एकमतावर असणे आवश्यक असते. अन्यथा मुल या मतांतराचा फायदा घेऊ शकते. ‘मुलाला शिस्त लावणे’ संबंधातील मतभेदांवर मुलाच्या अनुपस्थितीत चर्चा करावी व आवश्यक तेथे संपूर्ण कुटुंबाने समुपदेशकाचे मार्गदर्शन घ्यावे.
कुटुंबाने एकत्रितरित्या नीट विचार करून, योग्य पद्धती वापरून, मुलाला वागणे शिकवले तर विशेष मुलाला सांभाळण्याची जबाबदारी कोणालाच ‘विशेष’ वाटणार नाही.
-रेश्मा भाईप








