ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माती कंपनी ‘विवो’ भारतात 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीने सध्याची मोबाईल उत्पादन क्षमता 3.3 कोटी युनिट्सवरून 12 कोटी युनिट्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती विवो इंडियाचे संचालक निपुण मारया यांनी दिली.
मारया म्हणाले, विवोने भारतातच मोबाईल फोन विकसित करण्यासाठी इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रेटर नॉयडा येथील प्रकल्पाच्या विस्तारासाठी 7 हजार 500 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.कंपनीने आपले मोबाईल उत्पादन 12 कोटी युनिट्सपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या 50 हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
विवो मोबाईलच डिझाईन आणि उत्पादन भारतात घेईल. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन या मोबाईल्सचे नवीन डिझाईन तयार करण्यात येतील. 2021 मध्ये पहिल्या भारतीय बनावटीच्या विवो मोबाईलचे भारतात लॉन्चिंग होईल, असेही मारया यांनी सांगितले.









