प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने सोमवारपासून 14 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या कालावधीत विवाह समारंभांत सशर्त परवानगी देण्यात आली असली तरी केवळ 40 जणांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडण्याचा सुधारित आदेश शनिवारी देण्यात आला आहे. शिवाय समुदाय भवन, सभागृह, कल्याण मंटपांमध्ये विवाह समारंभांचे आयोजन करण्यासाठी सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे विवाह समारंभ घरातच उरकावे लागणार आहेत.
विवाह समारंभांना उपस्थित राहणाऱयांना पासची सक्ती करण्यात आली आहे. विवाहांसाठी परवानगी घेत असतानाच हे पास वितरीत केले जातील. महापालिका कार्यक्षेत्रांमध्ये आयुक्त व इतर ठिकाणी तहसीलदार पास वितरीत करतील. तसेच लग्नाचे आयोजन केलेल्या ठिकाणी मार्शल किंवा इतर कर्मचारी निमंत्रितांना विवाह निमंत्रण पत्रिका आणि पास तपासूनच प्रवेश देतील. हे पास अहस्तांतरणीय असतील. 10 मे 24 मे पर्यंत हा आदेश जारी राहणार आहे. कोरोना मार्गसूचीनुसार सुरक्षा नियमांचे पालन करणेही अनिवार्य राहणार आहे.
स्टील, सिमेंट कारखाने सुरु राहणार
महसूल खात्याचे सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांनी जारी केलेल्या मार्गसूचीमध्ये लॉकडाऊन कालावधीत लोखंड आणि स्टील उत्पादन क्षेत्रातील कारखाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे सिमेंट उत्पादन होणारे कारखानेही सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.









