सातजणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले : 15 निवारा केंद्रांमध्ये 558 लोकांची व्यवस्था
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
‘कोरोना’ची किरकोळ लक्षणे असणाऱया आणखी एका रुग्णाला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या कक्षात एकूण 22 रुग्ण उपचार घेत आहेत. परराज्यातील मजूर, कामगार तसेच बेघर यांच्यासाठी जिह्यात 15 निवारा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या निवारा केंद्रांमध्ये 558 व्यक्तींनी आसरा घेतला असून त्यांच्या निवासासह भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
आंबोली
रेस्ट हाऊस, जिल्हा परिषद शाळा शेर्ले, बांदा, आंबोली पब्लिक स्कूल, मळगाव, देवळी,
नांदरुख, घोटगे, श्रावण, मालवण, कुडाळ, निवजे जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा, पिंगुळी, कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय आणि खारेपाटण
या ठिकाणी ही निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी राहणाऱया व्यक्तींच्या
आरोग्याची तपासणी करण्यात आली असून एक आरोग्य सेवक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला
आहे. या केंद्रांमधील व्यक्तींना सध्याच्या परिस्थितीत घ्यायची काळजी आणि आरोग्याविषयी
जागरुकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. जिह्यात संचारबंदी असतांनाही विनाकारण
दुचाकीवरून फिरणाऱयांवर 14 गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 वाहने जप्त करण्यात आली
आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात 22 रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 63 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 56 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. उर्वरित नमुन्यांचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. आरोग्य यंत्रणेमार्फत रविवारी 431 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सध्या जिह्यात 339 व्यक्तींचे घरीच विलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक विलगीकरण कक्षात 53 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे.
1 घरीच विलगीकरण करण्यात आलेले 339
2 संस्थात्मक विलगीकरणात असलेले 53
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 63
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 56
5 पॉझिटिव्ह आलेले नमुने 1
6 निगेटिव्ह आलेले नमुने 55
7 अलवाल प्राप्त न झालेले नमुने 07
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 22
9 आज तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 431
साठेबाजी व नफेखोरी करणाऱयांवर होणार कारवाई
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान व्यापारी व दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी करू नये. तसेच वस्तू चढय़ा दराने विकू नयेत. अशाप्रकारे कोणी साठेबाजी व नफेखोरी करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व जीवनाश्यक वस्तू अधिनियम 1955 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी सांगितले आहे.
अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू व कृषी मालाची वाहतूक करणाऱया वाहनांना परवानगी असून त्यांना स्वतंत्र परवाना घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सर्व घाऊक व किरकोळ व्यापाऱयांनी आपल्या दुकानात आवश्यक साठा उपलब्ध करून द्यावा. त्याप्रमाणे मागणीही करावी व जिह्यात अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत तांदूळ
जिह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून असे तीन महिने, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत मिळणाऱया धान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमहा पाच किलो तांदळाचे मोफत वितरण होणार आहे. सदर वितरणावेळी लाभार्थ्याने नियमित धान्याची उचल केली आहे का, याची खातरजमा करण्यात येणार आहे. मोफत तांदळाचे वितरण व नियमित मिळणारे अन्नधान्य त्या-त्या महिन्यात वितरण करण्यात येणार असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकाऱयांनी कळविले आहे.









