व्यावसायिक हितसंबंध नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीविरुद्ध व्यावसायिक हितसंबंधांबाबत बीसीसीआयच्या एथिक्स अधिकाऱयांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची तपासणी केली जात असून यापूर्वीही अनेक खेळाडूंविरुद्ध अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करण्यात आले होते, असे एथिक्स ऑफिसर डी.के. जैन यांनी म्हटले आहे. नामवंत खेळाडूंवर विनाकारण आरोप करून ब्लॅकमेल करण्याचाच हा प्रकार असल्याचेही ते म्हणाले.
गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कोहलीने दोन पदे भूषवित व्यावसायिक हितसंबंधांत बाधा आणली आहे. तो भारतीय संघाचा कर्णधारही आहे आणि टॅलेंट व्यवस्थापन कंपनीचा संचालकही आहे. याशिवाय या कंपनीच्या मंडळात त्याच्या संघसहकाऱयांचीच नावे आहेत. एकाच वेळी त्याने दोन पदे सांभाळून बीसीसीआयच्या घटनेचे उल्लंघनच केले आहे, असे गुप्ता यांचे म्हणणे आहे. ‘माझ्याकडे या संदर्भात तक्रार आली आहे. मी त्याची तपासणी करून विराटकडून खरोखरच घटनेचे उल्लंघन झाले आहे का, हे ठरविणार आहे. त्याने तसे केले असल्यास त्याची बाजू मांडण्याची संधीही त्याला दिली जाईल,’ असे जैन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
कॉर्नरस्टोन व्हेन्चर पार्टनर्स एलएलपी व विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपी यांच्या संचालकांपैकी कोहली एक संचालक असल्याचा दावा गुप्ता यांनी केला आहे. या संचालक मंडळात असलेले सहसंचालक अमित अरुण सजदेह, बिनॉय भारत खिमजी हेदेखील टॅलेंट व्यवस्थापन कंपनी कॉर्नरस्टोन स्पोर्ट अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.मध्येही कार्यरत आहेत. कॉर्नरस्टोन स्पोर्ट कंपनीत कोहलीची तशी प्रत्यक्ष कोणतीही भूमिका नाही. मात्र ही कंपनी कोहली व त्याच्या अनेक संघसहकाऱयांच्या व्यवहारांचे व्यवस्थापन करते. या खेळाडूंत केएल राहुल, ऋषभ पंत, रवींद जडेजा, उमेश यादव, कुलदीप यादव यांचा समावेश आहे. ‘या गोष्टींचा विचार करता, कोहली दोन पदे सांभाळत असल्याचे स्पष्ट होत असून उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या बीसीसीआय नियमाचे थेट उल्लंघन त्याच्याकडून झाले आहे. त्यामुळे त्याने एक पद सोडणे आवश्यक आहे,’ असे गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे.
जैन यांना आपल्या पदाच्या पहिल्याच वर्षी माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, कपिल देव यांच्याविरुद्ध व्यावसायिक हितसंबंध बाधेच्या तक्रारींना सामोरे जावे लागले होते. या सर्व तक्रारी देखील संजीव गुप्ता यांनीच केल्या होत्या. या तक्रारी बिनबुडाच्या असल्याचे स्पष्ट होण्याआधीच या सर्व खेळाडूंनी आपापल्या एका पदाचा राजीनामा दिला होता. लोधा समितीने या संदर्भात केलेली नियमावली अव्यवहार्य असल्याचे बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी याआधीच म्हटले आहे.









