वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना विषाणूशी लढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला मदत करणाऱया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व अनुष्का शर्माने मुंबई पोलिसांच्या कल्याणनिधीलाही आर्थिक मदत केली आहे. विराट व अनुष्काने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत केली असल्याचे ट्विट मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहे. गत महिन्यात विराट-अनुष्का या जोडीने पंतप्रधान व महाराष्ट्र, दिल्ली सरकारच्या सहायतानिधीला मदत केली होती. पंरतु नेमकी किती मदत केली होती हे जाहीर करण्यात आले नव्हते. आता, या जोडीने मुंबईच्या नागरिकांची सुरक्षा करणाऱया मुंबई पोलिसांच्या कल्याणनिधीला 10 लाख रुपये दिले आहेत. हा निधी मुंबई पोलिसांच्या आरोग्य व सुरक्षितेसाठी वापरला जाणार असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त सिंग यांनी स्पष्ट केले.









