पनवेलहून गुहागरला निघाला होता दुचाकीने, कशेडीत पोलिसांनी अडवले,
प्रतिनिधी/ खेड
नवीमुंबई-पनवेल येथून एक 26 वर्षिय तरूण प्रेयसीला भेटण्यासाठी दुचाकीवरून गुहागरच्या दिशेने निघाला. महामार्गावरील कशेडी येथे नाकाबंदीदरम्यान तो पोलिसांच्या जाळय़ात अडकला. विरह सहन होत नसल्याने प्रेयसीला भेटण्यासाठी गुहागरला जाण्याकरिता मुभा देण्याची केलेली विनंतीही पोलिसांनी धुडकावून लावल्याने त्याला आल्यापावली माघारी परतावे लागले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात आहेत. अशा नागरिकांवर कायदेशीर कारवाईचा बडगादेखील उगारण्यात येत आहे. अनेकजण गाव गाठण्यासाठी पोलिसांना चकवा देण्याकरिता विविध कारणे सांगत आहेत. काकीच्या मृत्यूसह आजोबांचे निधन झाल्याचे कारण पुढे करत गाव गाठण्याचा प्रयत्न करणाऱया पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचे बिंग फोडले आहे.
या घटना ताज्या असतानाच नवी मुंबई-पनवेल येथील हा तरूणही दुचाकीने थेट प्रेयसीला भेटण्यासाठी गुहागरला निघाला. कशेडी येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी त्याची दुचाकी थांबवून विचारणा केली असता आपण गुहागर येथील प्रेयसीला भेटण्यासाठी जात असल्याचे त्यने सांगितले. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बरेच दिवस प्रेयसीची भेट झालेली नसून विरह सहन होत नसल्याने पुढील प्रवासास परवानगी देण्यासाठी तो गयावया करू लागला. मात्र पोलिसांनी त्याच्याकडे प्रवासाचा कुठलाही परवाना नसल्याने जिल्हय़ात प्रवेश नाकारला. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांनी त्यास कडक शब्दात समजही दिली. यानंतर हा तरूण दुचाकीने परतीच्या प्रवासाला निघाला.









