आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप- साक्षी मलिक, दिव्या काकरन यांचीही आगेकूच
वृत्तसंस्था/ अल्माटी
येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या विनेश फोगट व अन्शू मलिक यांनी पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले तर साक्षी मलिकनेही अंतिम फेरी गाठली आहे. याशिवाय दिव्या काकरन हिनेही आगेकूच केली आहे.
या स्पर्धेत चीन व जपानच्या कुस्तीपटूंनी भाग घेतलेला नसल्याने विनेशला विजेतेपद मिळविणे सोपे गेले. 53 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत तिने एकही गुण गमविला नाही. तिने आतापर्यंत आशियाई स्पर्धेत सात पदके पटकावली असून याआधी तिने 3 रौप्यपदके पटकावली आहेत. काही दिवसांपूर्वीच येथे झालेल्या स्पर्धेत ऑलिम्पिक कोटा मिळविलेल्या 19 वर्षीय अन्शूने 57 किलो गटात पुन्हा एकदा प्रभावी प्रदर्शन करीत सुवर्ण मिळविले. मंगोलियाच्या बॅटत्सेत्सेग अल्टांत्सेत्सेगवर तिने सहज मात केली. प्रारंभी डबल लेग ऍटॅकवर मिळविलेल्या गुणानंतर मंगोलियाच्या खेळाडूला अखेरपर्यंत अन्शूच्या आक्रमणापुढे बचाव करण्यावर भर द्यावा लागला.
तत्पूर्वी, विनेशने मंगोलियाची ओटगाँजरगल गनबातार व तैपेईची मेंग सुआन सीह यांच्यावर तांत्रिक सरसतेवर विजय मिळविले तर उपांत्य फेरीत कोरियाची जखमी झालेली हय़ुनयंग ओहने माघार घेतल्याने विनेशला अंतिम फेरीत स्थान मिळाले. नवी दिल्लीत झालेल्या मागील स्पर्धेत विनेशने कांस्य मिळविले होते. अंतिम फेरीत विनेशने 6-0 अशी झटपट आघाडी घेतली आणि पहिल्या फेरीतच प्रतिस्पर्धीला खाली घेत विजय मिळविला. अन्शूने पहिल्या दोन लढती तांत्रिक सरसतेवर जिंकल्या. तिने उझ्बेकची सेव्हारा इश्मुराटोव्हा व किर्गीजस्तानची नझिरा मार्सबेक यांचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. चपळ हालचाली आणि प्रचंड ताकदीपुढे प्रतिस्पर्धी तिच्यापुढे टिकाव धरू शकल्या नाहीत. अंतिम लढतीत अल्टांत्सेत्सेगवर तिने 9-1 अशी आघाडी घेतली असताना रेफरींनी अन्शूला ‘व्हिक्टरी बाय कॉशन’च्या आधारे विजयी घोषित केले. अल्टांत्सेत्सेगला रेफरींनी तीनदा ताकीद दिली होती.
65 किलो वजन गटात भारताच्या साक्षी मलिकनेही अंतिम फेरी गाठली आहे. तिने पहिल्या दोन लढती तांत्रिक सरसतेच्या आधारे जिंकल्या. कोरियाच्या हनबिट ली हिच्यावर तिने 3-0 अशी आघाडी मिळविली असताना लीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिने लढतीतून माघार घेतली आणि साक्षीला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली. जेतेपदासाठी मंगोलियाच्या बोलोरतुनगलग झॉरिग्टविरुद्ध तिची लढत होणार आहे. याशिवाय दिव्या काकरनने 72 किलो वजन गटात आशियाई चॅम्पियन कझाकच्या झमिला बाकबर्गेनोव्हाला 8-5 अशा गुणांनी चकित करून तिसरी फेरी गाठली आहे.









