सातारा / प्रतिनिधी
वाई शहरात विना परवाना लाकूड कोळसा वाहतूक करताना आढळून आल्याने वाई वनविभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती वाई वन परीक्षेत्राचे वनाधिकारी महेश झांजुरणे यांनी दिली.
वाई शहरात वन विभागाच्या पथकाला गस्तीवेळी दि.27रोजी रात्री अडीच वाजता रविवार पेठेत टेंपो आढळून आला. तपासणी केली असता त्यामध्ये लाकडी कोळसा होता. त्यावरून टेंपो चालक सुधीर सुरेश मोरे (रा. कऱ्हावागज, ता. बारामती) याच्याकडे वाहतूक परवान्याबाबत विचारले असता तो नसल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून 3 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
उप वनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक सचिन डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे वन परिक्षेत्र अधिकारी महेश झांजुरणे, वनपाल सुरेश पटकारे, वैभव शिंदे, वन रक्षक सुरेश सूर्यवंशी, वसंत गवारी, वनसेवक महेंद्र गोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.