आमदार डॉ. अन्नदानी यांनी वेधले सभाध्यक्षांचे लक्ष : सभाध्यक्षांनी निर्णय घेण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी : दिलेल्या ग्वाहीचा विसर
प्रतिनिधी /बेळगाव
विधानसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र लावण्याची मागणी बुधवारी करण्यात आली. भोजन विरामानंतर आमदार डॉ. अन्नदानी यांनी याकडे सभाध्यक्षांचे लक्ष वेधले. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अधिवेशनात बाबासाहेबांचे छायाचित्र लावण्याची ग्वाही देण्यात आली होती. अद्याप ते का लावले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भोजन विरामानंतर सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना अतिवृष्टीवरील उर्वरित विषय मांडण्यासाठी सांगितले. त्यासाठी सिद्धरामय्या उभे राहिले. त्याचवेळी डॉ. अन्नदानी यांनी ही मागणी करीत सरकारला डॉ. बाबासाहेबांचे वावडे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. निजदचे एच. के. कुमारस्वामी यांनी या चर्चेत हस्तक्षेप करीत याविषयी चर्चा करण्याची गरज नाही. सभाध्यक्षांनीच निर्णय घ्यावा, असे सांगितले.
सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी डॉ. बाबासाहेबांचा फोटो लावण्यासाठी चर्चेची गरज नाही. तो लावलाच पाहिजे. मात्र, हा विषय मांडण्यासाठी संसदीय लोकशाहीत एक पद्धत आहे. नियमानुसार विषय मांडण्याची गरज आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून कोणकोणती छायाचित्रे लावावीत, यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यानंतरही डॉ. अन्नदानी यांच्यासह अनेक आमदारांनी आताच निर्णय घ्या, अशी मागणी केली. माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी बाबासाहेबांचा फोटो लावण्यासाठी चर्चा कसली करायची? निर्णय घ्या, अशी मागणी केली.
भाजपचे बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनीही या विषयावर चर्चा नको. बाबासाहेबांचा फोटो लावा, अशी मागणी केली. या चर्चेत भाग घेत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बेंगळूर येथील विधानसौधमध्ये जी छायाचित्रे आहेत, ती इथेही लावा. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावणे हा चर्चेचा विषय नाही, असे सांगितले. त्यानंतर सभाध्यक्षांनी निर्णय घेण्याचे सांगून हा विषय संपविला.









