ऑनलाईन टीम / मुंबई :
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची एकमताने निवड झाली. नीलम गोऱ्हे दुसऱ्यांदा विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान झाल्या आहेत.
उपसभापतीपदाच्या निवडणुकीला आक्षेप घेत भाजपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण कोर्टात असल्याने ही निवडणूक घेऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती.
मात्र निवडणूक घेण्याचा हा सभापतीचा अधिकार असून तो न्यायालयीन कक्षेत येत नाही, असे सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक घेतली. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर आवाजी मतदानानंतर नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
नीलम गोऱ्हेंची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापती म्हणून दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, असे म्हटले आहे.








