प्रतिनिधी /बेळगाव
दरवर्षी शाळांना प्रारंभ झाला की, विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठय़ पुस्तकाचे मोफत वितरण केले जायचे. मात्र यंदा शाळा उशिरा सुरूवात झाल्याने पाठय़पुस्तके आणि गणवेशदेखील उशिरा वितरीत करण्यात आले आहेत. शहरी भागातील सरकारी आणि अनुदानित विद्यार्थ्यांना 3 लाख 14 हजार 360 पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत.
यंदा शैक्षणिक वर्षाला उशिरा प्रारंभ झाला असला तरी शासनाने माध्यान्ह आहार, दूध, गणवेश आणि पाठय़ पुस्तकांचे वितरण केले आहे. शहरातील सर्व विद्यार्थ्यांना या सुविधा पुरविण्यात आल्याची माहितीही शहर गट शिक्षणाधिकाऱयांनी दिली आहे. शहरी भागातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सरकारी शाळेतील 15 हजार 521 विद्यार्थ्यांना आतापर्यंत गणवेश वितरण करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना दरवषी गणवेशाचे दोन जोड दिले जात होते. मात्र यंदा आतापर्यंत एकच गणवेश विद्यार्थ्यांना मिळाला आहे. त्यामुळे दुसऱया टप्प्यातील गणवेशाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी आहेत. शाळांना उशिरा प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळाला आहे. मात्र दूध, माध्यान्ह आहार, पाठय़पुस्तके उपलब्ध झाली आहेत.









