शासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभाव, विद्यार्थ्यांची सिव्हिल हॉस्पिटलसमोर गर्दी
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालये मंगळवारपासून सुरू झाली आहेत. मात्र कॉलेजला जाण्यासाठी कोरोना तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेतील समन्वयाअभावी तपासणीत घोळ होत असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी वेगवेगळी पथके नियुक्त केली आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या आयुक्तांनी 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व आरोग्याधिकाऱयांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या तपासणीविषयी सूचना केल्या आहेत. कॉलेजला जाण्यापूर्वी 72 तास आधी कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश आहे.
पहिल्या टप्प्यात प्राध्यापक व कर्मचाऱयांची त्या-त्या कॉलेजमध्ये जाऊन तपासणी करण्यात आली आहे. प्रमाणपत्र सक्तीचे असल्यामुळे विद्यार्थ्यांची सिव्हिल हॉस्पिटल बाहेर गर्दी होत आहे. विद्यार्थ्यांची गर्दी आणि सिव्हिलमधील अपुरी यंत्रणा यामुळे रांग वाढतच चालली आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
अनेक तास सिव्हिल हॉस्पिटल बाहेर तपासणीसाठी ताटकळत उभे रहावे लागत आहे, अशी तक्रार ‘तरुण भारत’कडे विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंबंधी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्य विभागानेही तपासणीची सोय केली आहे. बिम्समध्ये रोज 200 विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारपासून सर्व ओपीडी सुरू
जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इतर आजारांवरील उपचारांसाठी ओपीडी सुरू केली आहे. सध्या दुपारी 1 पर्यंत रुग्ण तपासणी करण्यात येत आहे. सोमवार दि. 23 नोव्हेंबरपासून पूर्वीप्रमाणे सिव्हिलमधील सर्व ओपीडी सुरू राहणार आहेत, अशी माहिती डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी दिली.
बेळगाव तालुक्मयासाठी 15 पथके कार्यरत…
यासंबंधी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्याशी संपर्क साधला असता बेळगाव तालुक्मयासाठी 15 पथके कार्यरत आहेत. पीएचसी, तालुका इस्पितळातही विद्यार्थ्यांसाठी कोरोना तपासणी सुरू आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेतात त्यांची तपासणी केली जाणार नाही. जे क्लासला येणार आहेत, त्यांची तपासणी सक्तीची आहे, असे त्यांनी सांगितले. एका सिव्हिल हॉस्पिटलवर ताण पडू नये म्हणून 15 पथके तयार करून त्यांना या कामी जुंपण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यासंबंधी कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधून सूचना करण्यात आल्या आहेत. तालुका इस्पितळे, पीएचसीमध्ये विद्यार्थ्यांसाठी तपासणी सुरू असताना सगळय़ांनी सिव्हिलला जाण्याची गरज नाही, असे जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकाऱयांनी सांगितले.









