- भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सामंजस्य करार
ऑनलाईन टीम / पुणे :
भारतीय कला संस्कृती, महाकाव्ये, वन्यजीवन, मंदिर वास्तुकला, लोककला, परंपरा, योग, पाककृती, पारंपरिक नृत्य आदी भारतीय कला आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातूनही अभ्यासता येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्यात सामंजस्य करार होणार असून या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या भारतीय कला अभ्यासता येणार आहेत. 18 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या शिवाजी सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर या करारावर स्वाक्षरी करणार आहेत.
पारंपरिक भारतीय ज्ञान व कलांबाबत जगभरात कुतूहल आहे. त्यामुळेच या कला जगभरात पोहचण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद प्रयत्नशील आहे. या करारानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ई कॉन्टेन्ट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेन्टरकडून तयार करण्यात आलेल्या 1300 व्हिडिओच्या माध्यमातून छोटे कॅप्सूल कोर्स तयार करण्यात येणार आहेत.
विद्यापीठातील तज्ञ व्यक्ती या कोर्सेसची रचना करणार असून यामध्ये ई कोर्सेस, प्रेझेन्टेशन, क्विज अशा आदी बाबींचा समावेश असेल. हा अभ्यासक्रम केवळ परदेशी विद्यार्थ्यांनाच नाही तर भारतीय संस्कृती जगभरात पोहचवू इच्छिणाऱ्या सर्वांना उपयुक्त ठरणारा आहे.