वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये विविध क्रीडा प्रकारांसाठी विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती यापूर्वी करण्यात आली होती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने आपल्या खेळाडूंकरिता विदेशी प्रशिक्षक नियुक्त केले होते. पण कोरोना महामारीमुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2021 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्याने या विदेशी प्रशिक्षकांच्या कराराच्या मुदतीत वाढ केली जाईल, असे राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळातर्फे (साई) आपल्या विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीकरिता विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली होती. त्यांच्याबरोबर ऑगस्टअखेरपर्यंत करार करण्यात आला होता. पण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याने या विदेशी प्रशिक्षकांच्या कराराच्या मुदतीत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. साईतर्फे विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना दर्जेदार मार्गदर्शन मिळण्याकरिता 38 विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. बास्केटबॉल, टेबल टेनिस, फुटबॉल, ज्युडो, जलतरण या क्रीडा प्रकारांसाठी विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने 8 विदेशी प्रशिक्षकांच्या करारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या कराराची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपणार होती.









