नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या परकीय गंगाजळीत म्हणजे विदेशी चलनाच्या साठय़ात 8 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून विदेशी चलनाच्या साठय़ाने विक्रम केला आहे. 6 नोव्हेंबरला संपलेल्या आठवडय़ात परकीय चलनासाठा 568.49 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात दिवाळी साजरी होत असतानाच देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारी आकडेवारी जाहीर झाली आहे.
विदेशी चलन साठय़ात एका आठवडय़ात 7.77 अब्ज डॉलरची विक्रमी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. 30 ऑक्टोबरला संपलेल्या आठवडय़ात परकीय चलन साठय़ात 18.3 कोटी डॉलरची वाढ होत तो 560.715 अब्ज डॉलरवर पोहचला होता. परकीय चलन साठय़ाचा हा विक्रम आहे.
अन्य देशातील चलन हे परकीय चलन साठय़ाचा महत्त्वाचा भाग असतो. परकीय चलन साठय़ात वाढ झाल्याने देश जास्त प्रमाणात आयात करू शकतो. त्यामुळे देशाची आयात करण्याची क्षमता वाढून देशाचा व्यापार वाढणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार आहे.









