अमेरिका, चीन आणि युएईकडून मिळाल्या सर्वाधिक ऑर्डर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात ओसरत गेल्यामुळे विदेशातील बाजार सुरु होण्यास सुरुवात झाली होती. यामुळे रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीमधील आकडेवारीतून विदेशात दागिन्यांची मागणी वाढत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. या संदर्भात अधिकृत आकडेवारी जेम्स आणि ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउसिंल (जीजेइपीसी) यांच्यानुसार एप्रिलमध्ये जवळपास 25,226.11 कोटी रुपयांची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात करण्यात आली असल्याची माहिती आहे.
जीजेइपीसीच्या उपलब्ध माहितीनुसार मागील वर्षात कोरोनाच्या प्रभावामुळे आणि लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रत्ने आणि दागिन्यांची निर्यात मोठय़ा प्रमाणात प्रभावीत राहिली होती. एप्रिल 2020 मध्ये फक्त 273.41 कोटी रुपयांच्या रत्ने आणि दागिन्यांची निर्यात झाल्याची नेंद केली आहे. तसेच चालू एप्रिल 2021 मध्ये 16,538 कोटी रुपयांचे कट ऍण्ड पॉलिश्ड डायमंडची (सीपीडी) निर्यात केली होती. एप्रिल 2020 मध्ये या सेगमेंटमध्ये फक्त 261.19 कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली आहे.
सोन्याच्या दागिन्यांची निर्यात
एप्रिल 2021 मध्ये 5,060.23 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची निर्यात करण्यात आली आहे. मागील वर्षातील समान कालावधीत फक्त 1.55 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची निर्यात करण्यात आली होती. चालू वर्षात 2240.13 कोटी रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांची निर्यात केली आहे.
दुसऱया लाटेतही सकारात्मक प्रभाव
कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावामध्ये भारताने 25,226.11 कोटी रुपयांच्या रत्ने आणि दागिन्यांची निर्यात केली असून ही बाब सकारात्मक असल्याचे मत जीजेइपीसीचे अध्यक्ष कोलिन शाह यांनी व्यक्त केले आहे.
मिळाल्या मजबूत ऑर्डर
अर्थव्यवस्थेला गती राहण्यासाठी जगभरातील निर्यात बाजार सुरु राहिल्याने विविध स्तरांवरील घडामोडींमध्ये तेजी राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये विदेशातील विविध देशांमधून दागिन्यांची मागणी मजबूत राहिल्याचा फायदा यावेळी झाला असल्याचेही अध्यक्ष शहा यांनी स्पष्ट केले आहे.









