टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा ः 11 व्या फेरीत प्रज्ञानंदला कारुआनाचा धक्का
विझ्क आन झी-नेदरलँड्स / वृत्तसंस्था
भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीने टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेच्या 11 व्या फेरीत विद्यमान अव्वलमानांकित मॅग्नस कार्लसनला बरोबरी रोखण्याचा पराक्रम साकारला. या निकालामुळे त्याने संयुक्त चौथे स्थान कायम राखले. सध्या त्याच्या खात्यावर 6 गुण आहेत. कार्लसन 7.5 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान आहे.
या स्पर्धेत सहभागी आणखी एक भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला मात्र अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला. प्रज्ञानंदच्या खात्यावर 3.5 गुण असून तो अन्य 2 ग्रँडमास्टर्ससह संयुक्त 12 व्या स्थानी घसरला.
विद्यमान विजेत्या कार्लसनला गुजराथीविरुद्ध सहज विजयाची संधी होती. पण, वर्चस्व गाजवूनही त्याला विजयाची संधी साधता आली नाही. डचमन अनिश गिरीला त्याचाच राष्ट्रीय सहकारी जॉर्डन व्हान फॉरेस्टविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्याची तिसऱया स्थानी घसरण झाली. रिचर्ड रॅपोर्टने डॅनिल डुबोव्हला नमवत गुणतालिकेत दुसऱया स्थानी झेप घेतली.
कार्लसनने विदित गुजराथीविरुद्ध एनसी3 चालीसह इटालियन गेमचा अवलंब केला. पण, विदितने उत्तम प्रत्युत्तर देत पटावर समसमान स्थिती कायम राहील, याची उत्तम तजवीज केली. अर्थात, गुजराथीची 28 वी चाल चुकीची झाली आणि याचा कार्लसनने लाभ घेत पटावर आपली स्थिती मजबूत केली. मात्र, विद्यमान जेत्याकडूनही 36 व्या चालीला चूक झाली आणि त्याला विजयाची स्थिती असतानाही बरोबरीवर समाधान मानावे लागले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अद्याप दोन फेरी होणे बाकी आहे.
11 व्या फेरीअखेर गुणतालिका
1) मॅग्नस कार्लसन-7.5 गुण, 2) रिचर्ड रॅपोर्ट-7 गुण, 3 व 4) मेमेद्यारोव्ह व अनिश गिरी-प्रत्येकी 6.5 गुण, 5 ते 8) विदित गुजराथी, सर्जेई कर्जाकिन, आंद्रेय इसिपेंको, फॅबिआनो कारुआना-प्रत्येकी 6 गुण, 9) जॉर्डन व्हान फॉरेस्ट-5.5 गुण, 10) जान-क्रिझिस्तोफ-5 गुण, 11) सॅम शँकलँड-4.5 गुण, 12 ते 14) निल्स ग्रँडेलियस, प्रज्ञानंद, डॅनिल डुबोव्ह-3.5 गुण









