ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धा
वृत्तसंस्था/ बर्लिन
अखेर ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर विदीत गुजराथीने अपयशाची मालिका खंडीत करत पहिला विजय मिळवला पण त्याचा हा विजय युरोपविरुध्द भारतीय संघाला विजय मिळवून देण्यास पुरेसा ठरला नाही. आठव्या फेरीची ही लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली. यानंतर, भारतीय संघ गुणांकन क्रमवारीत पाच गुणासह पाचव्या स्थानावर आहे. चीनने 15 गुणासह पहिले स्थान कायम राखले असून अमेरिका 11 गुणासह दुसऱया, युरोप 10 गुणासह तिसऱया तर रशिया 5 गुणासह चौथ्या स्थानी आहे.
शुक्रवारी झालेल्या आठव्या फेरीच्या या लढतीत विश्वनाथन आनंद व वाचियेर लाग्रेव्ह दरम्यानचा डाव बरोबरीत सुटला. यानंतर विदित गुजराथीने दिग्गज ऍरोनियन लेव्हानला मात देत भारताला 1.5-0.5 अशी आघाडी मिळवून दिली. विदीतचा या स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. यानंतर क्रिस्ताफने पी. हरिकृष्णला मात देत ही लढत बरोबरीवर आणली. अखेरच्या लढतीत कोनेरु हम्पीला बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने ही लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली. आठव्या फेरीच्या या लढतीनंतर भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी राहिला. आता, भारतीय संघाचे चीन व रशियाविरुद्ध दोन सामने बाकी आहेत.
शेष विश्व संघावर भारताची सहजरित्या मात
तत्पूर्वी, या ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत शुक्रवारी भारताने आपल्या पहिल्यावाहिल्या विजयाची नोंद केली. विश्वनाथन आनंद व पी. हरिकृष्ण यांच्या विजयांच्या आधारे भारतीय संघाने शेष विश्व संघाला 2.5-1.5 अशा फरकाने पराभूत केले. विशेष म्हणजे, सहा संघाच्या या स्पर्धेत भारताने चार पराभव स्वीकारले असून दोन लढती बरोबरीत सोडवल्या आहेत. सातव्या फेरीत आनंदने तैमुरला तर पी. हरिकृष्णने जॉर्ज कोरीला मात दिली. विदीत गुजराथी इराणच्या अलीरझा फिरोझाकडून पराभूत झाला तर दोणावली हरिका व मारिया मुझीचूक यांना बरोबरी स्वीकारावी लागली.









