वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव आणि लॉकडाऊनमुळे बांधकामाची कामे मंदावली असून घरांच्या मागणीत घसरण झाल्याने सिमेंटची विक्री मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
परंतु या प्रभावासह वित्त वर्ष 2021 मध्येही सिमेंटची विक्री जवळपास 15 टक्क्मयांनी कमी राहणार असल्याची माहिती रेटिंग एजन्सी फिचच्या अहवालातून समोर आली आहे. फिचच्या माहितीनुसार सिमेंटची 65 टक्के इतकी मागणी एकटय़ा बांधकाम क्षेत्राकडून होत असते. सध्या म्हणावा तसा वेग या क्षेत्रात नसल्याने सिमेंटसह पोलादाच्या मागणीवर परिणाम होणार आहे.
अन्य क्षेत्रातील मागणी कमी होत गेल्याने चालू वित्त वर्षात स्टीलची मागणीही जवळपास 10 टक्क्मयांनी प्रभावीत राहणार असल्याचे म्हटले आहे. व्यवसायातील अनिश्चितता आणि बेरोजगारीच्या चिंतेमुळे ग्राहकांचा विश्वास कमी होत असल्याचेही या अहवालात नोंदवले आहे.
याच कारणामुळे रियल इस्टेट क्षेत्रातील मागणीवर मोठा परिणाम झाला आहे. यातून काही प्रमाणात मार्ग काढण्यासाठी विकासक रोख सवलतीच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. गृहकर्जावर सर्वात कमी व्याजदर असून अलीकडे नोंदणीशुल्कातही कपात करण्यात आल्याने स्थावर मालमत्तांच्या मागणीत काही प्रमाणात सुधारणा होणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत.









