वृत्तसंस्था/ कोझीकोडे
अलिकडेच आय लीग फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा गोकुळम केरळा एफसी संघाचे कोझीकोडेमध्ये असंख्य फुटबॉल चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर गोकुळम केरळा एफसी संघातील खेळाडूंचे चषकासमवेत केरळ फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱयांनी स्वागत केले.
गोकुळम केरळा एफसी संघाने दर्जेदार खेळाचे दर्शन घडवित पहिल्यांदाच आय लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली. गेल्या दोन दशकाच्या कालावधीत केरळला फुटबॉलमध्ये आपले वर्चस्व ठेवता आले नव्हते. पण यावेळी आय लीग फुटबॉल स्पर्धा जिंकून केरळा एफसीने आपला दर्जा पुन्हा सिद्ध केला आहे, अशी प्रतिक्रिया या संघाचे सीईओ अशोककुमार यांनी व्यक्त केली. गोकुळम केरळा संघ आता 2022 साली होणाऱया एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला आहे. आय लीग फुटबॉल स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात केरळ एफसी संघाने ट्राव एफसी संघाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. दरम्यान या स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स एफसी गोवा आणि गोकुळम केरळा यांचे समान गुण झाले. पण सरस गोलसरासरीच्या जोरावर गोकुळम केरळा एफसी संघाला आय लीग विजेता म्हणून घोषित करण्यात आले.









