प्रतिनिधी / बेळगाव
पाण्याची मोटर लावून पावसाचे पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का बसून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी हिरेबागेवाडी येथील बसवनगर परिसरात ही घटना घडली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
श्रीशांत श्रीकांत कोळवी (वय 14, रा. हिरेबागेवाडी) असे त्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मंगळवारी जोरदार पावसामुळे या मुलाच्या घराच्या पाठीमागे असलेल्या शौचालयाजवळील खड्डय़ात पावसाचे पाणी साचले होते. मोटर लावून पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू असताना बघण्यासाठी म्हणून गेलेल्या श्रीशांतला विजेचा धक्का लागला. त्याला तातडीने स्थानिक इस्पितळात नेण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.









