बाळीगिरी-मलाबाद मार्गावरील घटना ः हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे संताप
वार्ताहर/ अथणी
बाळीगिरी (ता. अथणी) येथील बाळीगिरी-मलाबाद रस्त्याशेजारी असलेल्या विद्युत खांबावर चढून दुरुस्तीचे काम करीत असलेल्या दोघा वायरमनना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. हनुमंत हालप्पा मगदूम (वय 35) व अशोक मल्लाप्पा माळी (वय 35, दोघेही रा. हिडकल, ता. रायबाग) अशी मृतांची नावे आहेत. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे दोघांचा हकनाक बळी गेल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ज्या अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाळीगिरी-मलाबाद या रस्त्याशेजारी असलेल्या विद्युत खांबांवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे हनुमंत व अशोक हे दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर चढले होते. मात्र अचानकपणे बाळीगिरी सबस्टेशनमधून वीजप्रवाह सोडण्यात आला. त्यामुळे विजेचा जोरदार धक्का लागल्याने या दोघांचा मृत्यू झाला. हेस्कॉमच्या अधिकाऱयांच्या दुर्लक्षपणाचा फटका या दोघांच्या जीवावर बेतला. घटनेनंतर केपीटीसीएलच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अथणी पोलिसांत नोंद झाली असून तपास सुरू करण्यात आला आहे. अथणी तालुक्यात अशा प्रकारची तिसरी घटना घडल्याने केपीटीसीएलच्या कामचुकार अधिकारी व कर्मचाऱयांविरोधात संताप व्यक्त होताना दिसत आहे.









