वार्ताहर/सोन्याळ
आजवर सेफ झोनमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक विजापूर शहरात एका महिलेसह सहाजणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे जिल्हाधिकारी एस. वाय. पाटील यांनी जाहीर केले आहे. शहरातील छप्परबंद गल्लीत राहणाऱ्या ६० वर्षांच्या एका महिलेसह सहाजणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर विजापूर सीमेच्या काही अंतरावर असलेल्या जत पूर्वभागात खळबळ उडाली असून आरोग्य आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा बंद करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
कोरोना बाधित महिला विजापुरातील छप्परबंद गल्लीत २५ जणांच्या एकत्रित कुटुंबात राहात होती.त्यामुळे घरातील इतर लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे का? याविषयी चर्चेला ऊत आला आहे.आजवर विजापूर जिल्हयातून पाठविलेल्या ११० जणांपैकी ८१ जणांचा स्वॅब चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या त्या महिलेस श्वासोच्छश्वास घेण्यास त्रास होत होता. तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तिची प्रकृती स्थिर असून तिला मधुमेह व रक्तदाब असल्याचे सांगण्यात येत आहे. तिला महाराष्ट्रातील संपकांमुळे कोरोनाची लागण झाली आहे का याविषयी शंका व्यक्त करण्यात येत असून याबाबतीत तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिकारी श्रीराम अरसिदी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शरण कट्टी, सर्वेक्षण अधिकारी डॉ. एम. बी. बिरादार आदी अधिकाऱ्याचे पथक निर्माण करण्यात आले आहे. तर, गोलघुमट पोलीस ठाण्याच्या परिसरातील वडी कमान, छप्परबंद, हरणशिकारी गल्ली, हकीम चौक, कामत हॉटेल आदी परिसर लॉकडाउन करण्यात आला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमा हाकेच्या अंतरावर!
जत तालुक्यातील सोनलगी, सुसलाद, आकळवाडी, कोतेंवबोबलाद, कागनरी, उमदी, मुचंडी बसर्गी, उमराणी आणि तिकोंडी आदी गावापासून कर्नाटकला जोडणारी सीमा अगदी जवळच्या अंतरावर आहे. या भागातील बहुतांश नागरिकांचे नातेवाईक कर्नाटक राज्याच्या सीमाभागात आहेत.शिवाय येथील बरीच आर्थिक व्यवहार यात किराणा, शेतीविषयक किंवा अन्य बाबींची खरेदी-विक्रीची कामे विजापूर-चडचणशी निगडित आहेत. या शहरांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्त्यावर पोलिसांची करडी नजर असली तरी ग्रामीण भागातील रस्त्यातून पळवाटा शोधत नागरिकांची चोरटी वाहतूक सुरूच असते. त्यामुळे असे वर्दळ चालूच राहीली तर कोरोनाचा जत पूर्वभागात प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Previous Articleमुख्यमंत्र्यांनी केली बेघरांची चौकशी
Next Article चार वर्षाच्या मुलीला कोरोना, पालकांवर गुन्हा दाखल








