बळ्ळारी जिल्हय़ाचे विभाजन करण्यास मंत्रिमंडळ राजी
प्रतिनिधी / बेंगळूर
बळ्ळारी जिल्हय़ाचे विभाजन करून विजयनगर हा 31 वा नवा जिल्हा लवकरच अस्तित्वात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विजयनगर जिल्हा अस्तित्वात आणण्यासाठी तत्वतः संमती दर्शविली आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला अधिकृतपणे मंजुरी देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे होस्पेट, संडूर तालुकावासियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बेंगळुरात मंत्रिमंडळ बैठक झाली. यावेळी बळ्ळारी जिल्हय़ाचे विभाजन करून विजयनगर हा नवा जिल्हा अस्तित्वात आणण्यास संमती मिळाल्याची माहिती वनमंत्री आणि बळ्ळारी जिल्हा पालकमंत्री आनंदसिंग यांनी दिली. नव्या जिल्हय़ांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश करावा, याबाबत पुढील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
विजयनगर जिल्हा अस्तित्वात आणण्याची मागणी करून अनेक दशकांपासून आंदोलन सुरू होते. त्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून लढा उभारला होता. आता मागण्यांची पूर्तता करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आपण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत असल्याचे आनंदसिंग म्हणाले.
मराठा विकास प्राधिकरण नव्हे; मराठा समुदाय निगम
राज्यात मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या निर्णयाला तीव्र विरोध व्यक्त झाल्याने राज्य सरकारने मराठा समुदाय निगम स्थापनेचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. कोणत्याही समाजाच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन केलेले नाही. निगम स्थापन करण्यात आले आहेत. भाषा, प्रांतांच्या विकासासाठीच प्राधिकरण स्थापन केले जातात. त्यामुळे प्राधिकरणाऐवजी मराठा समुदाय निगम स्थापनेचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी दिली.









