कोटक बँक सर्वाधिक नुकसानीत : निफ्टी 10,891.60 वर बंद
वृत्तसंस्था / मुंबई
मागील आठवडय़ात भारतीय शेअर बाजाराचा अंतिम तीन दिवसांचा प्रवास घसरणीचा राहिला होता. त्यानंतर शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर पुन्हा सोमवारी शेअर बाजार नेहमीप्रमाणे सुरु झाला. परंतु देशातील बाजारात विक्रीच्या दबावामुळे जवळपास 667 अंकांनी सेन्सेक्स कोसळला असल्याचे पहावयास मिळाले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे.
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी दिवसअखेर सेन्सेक्स 667.29 अंकांनी घसरुन 36,939.60 वर निर्देशांक बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 181.85 अंकांनी घसरुन निर्देशांक 10,891.60 वर बंद झाला आहे.
बीएसई सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या समभागामध्ये सर्वाधिक चार टक्क्मयांनी घसरण झाली असून सोबत इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, बजाज ऑटो आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग घसरले आहेत. यांच्याबरोबर विरुद्ध बाजूला टायटन, टाटा स्टील, एचसीएल टेक, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि स्टेट बँक यांच्या समभागांची कामगिरी तेजीत राहिली होती.
देशातील बाजारातील व्यवहारांमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेसह एचडीएफसीत जोरदार विक्रीच्या प्रभावामुळे शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली आहे. अन्य घडामोडींमध्ये विदेशी मुद्रा काढून घेतल्याने आणि कोविड 19 च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. संपूर्ण जगात 1.80 कोटीपेक्षा अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत तर यापैकी भारतात 18 लाखापेक्षा अधिक लोक कोरोनाच्या संसर्गात आल्याने देशामधील बाजारात घसरणीचे सत्र राहिलेले आहे. आगामी काळात बाजाराचा कल कसा राहतो हे पाहावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये शांघाय, टोकीयो, सोल यांचा कल सकारात्मक होऊन बंद झाला आहे.







