जमीन घोटाळाप्रकरण, एसआयटीकडून कधीही अटक होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ पणजी
जमीन घोटाळाप्रकरणात तपास करणाऱया गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने (एसआयटी) जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित विक्रांत शेट्टी याच्याविरोधात आणखी एक गुन्हा नोंद केला असून त्याला पुन्हा कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
संशयित विक्रांत शेट्टी याच्याविरोधात या अगोदर जमीन घोटाळा प्रकरणात एसआयटीने गुन्हा नोंद केला व अटकही केली होती. नंतर त्याची सशर्थ जामिनावर सुटका झाली होती. विक्रांत शेट्टी हा हणजूण येथील एका जमीन घोटाळा प्रकरणात अडकल्याचे निष्पन्न होताच एसआयटीने त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
विक्रांत शेट्टी याने गोव्यातील मोठय़ा प्रमाणात जमिनी बोगस कागदपत्रे तयार करून आपल्या व नातेवाईकांच्या नावे केली आहे. 70 हून अधिक जमीन घोटाळा प्रकरणात तो गुंतला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील तो एक मुख्य सूत्रधार आहे. एसआयटी त्याच्या एक एक प्रकरणाचा सखोल तपास करीत असून जशी माहिती उपलब्ध होते त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हे नोंद केले जात आहेत.
विक्रांत शेट्टीच्या काही साथीदारानांही यापूर्वी एसआयटीने अटक केली होती नंतर त्यांचीही सशर्थ जामिनावर सुटका झाली आहे. जमिनीची बोगस कागदपत्रे तयार करून त्या जमिनी आपल्या नावे करणे ही युक्ती विक्रांत शेट्टी याचीच होती व नंतर ती अनेकांनी अंमलात आणली.









