शुक्रवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत कालावधी : जिल्हाधिकाऱयांचा नवा आदेश
कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे विकेंड लॉकडाऊनच्या कालमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 6 पासून सोमवार दि. 7 रोजी सकाळी 6 पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजावले आहेत.
प्रतिनिधी / बेळगाव
मागील वेळी शनिवारी सकाळी 6 पासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत कडक लॉकडाऊन होता. मात्र, आता त्यामध्ये एक दिवसाने वाढ करण्यात आली असून शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस लॉकडाऊन राहणार आहे. या काळात केवळ हॉस्पिटल, मेडिकल व इतर वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत.
जीवनावश्यक वस्तूंमधील दूध विक्री करण्यास मुभा असणार आहे. सरकारमान्य रेशन दुकाने सुरू ठेवण्यास सकाळी 6 ते 10 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱयांसाठी बी-बियाणे आणि खत व औषध दुकाने सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत खुली ठेवावीत, असा आदेश देण्यात आला आहे. मात्र, इतर सर्व व्यवहार या काळात पूर्णपणे बंद ठेवायचे आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱयांवर भा.दं.वि. 188 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. त्यामुळे आता आणखी एका दिवसाने विकेंड लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी विवाह समारंभांसाठी घेतलेल्या परवानगीप्रमाणे त्यांना विवाह करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणी काटेकोर नियमांचे पालन करणेदेखील बंधनकारक आहे.
विवाह समारंभांमध्ये अधिक नातेवाईक आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. एकूणच आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे विकेंड लॉकडाऊनच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता तरी जनता शहाणी होणार की संपूर्ण लॉकडाऊनच होण्याची वाट पाहणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून आता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
पॉझिटिव्हीटीचा दर 5 टक्क्यांवर आल्यानंतरच अनलॉक
बेंगळूर राज्यात कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर 5 टक्क्यांपर्यंत आल्यानंतरच लॉकडाऊन निर्बंध हटविण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी काही जिल्हय़ांमध्ये संसर्ग अद्याप नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन वाढविण्याबाबत मुख्यमंत्री येडियुराप्पा सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतील. लॉकडाऊन एकदम हटविण्याऐवजी टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया हाती घेण्याचा सल्लाही तज्ञांनी दिला आहे. राज्यातील कोणत्याही मंत्र्यांनी लॉकडाऊन, अनलॉकसंबंधी प्रतिक्रिया दिली तरी येडियुराप्पाच अंतिम निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी देखील लॉकडाऊनविषयी प्रतिक्रिया दिली असून 7 जूननंतर लॉकडाऊन शिथिल करून अनलॉक प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात 7 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर सरसकट अनलॉक न करता ज्या-ज्या भागांमध्ये शक्य आहे तेथे टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याचा विचार असून तज्ञांबरोबर चर्चेनंतर निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.