इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकणारा संघ कायम ठेवण्याचा विंडीज निवड समितीचा निर्णय, वनडे मालिकेला रविवारपासून प्रारंभ
सेंट जॉन्स / वृत्तसंस्था
वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेतमेयर भारताविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर फेकला गेला. तंदुरुस्त नसल्यामुळे त्याचा 16 सदस्यीय विंडीज संघात समावेश करण्यात आला नाही. यापूर्वी, इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची मालिका जिंकणाऱया संघावरच निवडकर्त्यांनी विश्वास दाखवला असल्याचे निवडीवरुन स्पष्ट झाले. भारत-विंडीज यांच्यातील पहिली टी-20 दि. 16 फेब्रुवारी रोजी खेळवली जाणार आहे.
उभय संघातील 3 टी-20 सामने अनुक्रमे दि. 16, 18 व 20 रोजी खेळवले जातील. त्यापूर्वी, दि. 6, 9 व 11 फेब्रुवारी रोजी 3 सामन्यांची वनडे मालिका होईल. विंडीजने वनडे मालिकेसाठी पोलार्डच्या नेतृत्वाखालील आपला संघ यापूर्वीच जाहीर केला आहे.
विंडीजचे 11 खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातील दोन्ही संघांमध्ये असून त्यात पोलार्ड, फॅबियन ऍलन, डॅरेन ब्रेव्हो, जेसॉन होल्डर, शाय होप, अकिल हुसेन, ब्रेन्डॉन किंग, निकोलस पूरन, रोमारिओ शेफर्ड, ओडियन स्मिथ व हेडन वॉल्श ज्युनियर यांचा समावेश आहे.
हेतमेयरला तंदुरुस्तीच्या समस्येमुळे यापूर्वी देखील संघातील जागा सोडावी लागली होती. जानेवारी महिन्याच्या प्रारंभी विंडीज संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांनी हेतमेयरचे शारीरिक तंदुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष गंभीर असल्याचे सांगत याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली होती. 25 वर्षीय हेतमेयर इंग्लंडविरुद्ध मालिकेपूर्वी तंदुरुस्ती चाचणीत नापास झाला. इंग्लंडविरुद्ध बार्बाडोसमध्ये बेटवे टी-20 सिरीजमध्ये विंडीज संघ उत्तम कामगिरी करण्यात यशस्वी झाला आणि तो चमू कायम राखण्यावर सिमॉन्सने शिक्कामोर्तब केले, यात आश्चर्याचे कारण नव्हते.
‘बार्बाडोसमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत आमच्या संघाने उत्तम वर्चस्व गाजवले. सर्व खेळाडूंनी संघर्षमय खेळावर भर देत यश खेचून आणले. अशाच कामगिरीची पुनरावृत्ती भारताविरुद्ध मालिकेतही अपेक्षित आहे’, असे निवड समितीचे अध्यक्ष डेस्मंड हेन्स यांनी यापूर्वी नमूद केले होते. अष्टपैलू ओडियन स्मिथ वादाच्या भोवऱयात सापडला असला तरी या संघातील त्याचे स्थान अबाधित राहिले आहे. विंडीजने इंग्लंडविरुद्धची 5 सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली होती.
विंडीजचा टी-20 संघ ः केरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्रेव्हो, रॉस्टन चेस, शेल्डॉन कॉट्रेल, डॉमिनिक ब्रेक्स, जेसॉन होल्डर, शाय होप, अकिल हुसेन, ब्रेन्डॉन किंग, रोव्हमन पॉवेल, रोमारिओ शेफर्ड, ओडियन स्मिथ, काईल मेयर्स, हेडन वॉल्श ज्युनियर.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल

अहमदाबाद ः विंडीजविरुद्ध दि. 6 फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणाऱया वनडे मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडूंचे अहमदाबादमध्ये आगमन झाले. सर्व खेळाडू दोन टप्प्यात रविवार व सोमवार अशा दोन दिवसात बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. सर्व खेळाडूंना 3 दिवसांचे क्वारन्टाईन सक्तीचे असेल, असे मंडळाच्या पदाधिकाऱयाने स्पष्ट केले.
लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने रविवारी अहमदाबादला रवाना होण्यापूर्वी विमान प्रवासातील छायाचित्र आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केले. फिरकीपटू कुलदीप यादवला पुनरागमनाची संधी मिळाली असून रवी बिश्नोईला प्रथमच संघात स्थान लाभले आहे.
कोव्हिड-19 चा धोका अद्याप कायम असल्याने वनडे व टी-20 मालिका फक्त दोनच शहरांमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यानुसार, टी-20 मालिका कोलकातामध्ये तर वनडे मालिका अहमदाबादमध्ये होत असल्याचे मंडळाने जाहीर केले. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकाविजय संपादन करणारा विंडीजचा संघ आठवडाअखेरीस भारतीय भूमीत दाखल होणे अपेक्षित आहे.
कर्णधार नसतानाही मुख्य धुरा हाताळणे शक्य ः विराट

महेंद्रसिंग धोनीचे उदाहरण समोर ठेवले तर कर्णधार नसतानाही मुख्य धुरा हाताळणे शक्य असते, हे आपण पाहिले आहे. आता नेतृत्वाची जबाबदारी नसल्याने फलंदाजीवरच माझा पूर्ण भर असेल, असे प्रतिपादन विराट कोहलीने सोमवारी केले. ‘फायर साईड चाट वुईथ व्हीके’ या डीजिट शोमध्ये तो बोलत होता.
‘प्रत्येक पर्वाला एक कालावधी असतो आणि त्याची प्रत्येकाला जाण ठेवावी लागते. योगदानाबद्दल साशंकताही व्यक्त केल्या जाऊ शकतात. पण, ज्या-त्या खेळाडूचे योगदान सर्वज्ञात असते. आपण फक्त आपली जबाबदारी चोख पार पाडण्यावर अधिक भर देणे आवश्यक असते’, असे विराट पुढे म्हणाला.
‘यापुढे फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करता येईल, ही माझी जमेची बाजू असणार आहे. धोनी संघात होता. पण, कर्णधार नव्हता, त्यावेळी देखील आम्ही त्याच्याकडून सल्ला घेत असायचो. मी धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे आणि प्रदीर्घ काळ संघाचे नेतृत्व देखील सांभाळले आहे. नव्या सेटअपमध्ये फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे हा माझा प्राधान्यक्रम असेल’, याचा त्याने शेवटी उल्लेख केला.
भारत-विंडीज मालिकेची रुपरेषा
तारीख / सामना / वेळ / ठिकाण
6 फेब्रुवारी / पहिली वनडे / दु. 1.30 वा. / अहमदाबाद
9 फेब्रुवारी / दुसरी वनडे / दु. 1.30 वा. / अहमदाबाद
11 फेब्रुवारी / तिसरी वनडे / दु. 1.30 वा. / अहमदाबाद
16 फेब्रुवारी / पहिली टी-20 / सायं. 7.30 वा. / कोलकाता
18 फेब्रुवारी / दुसरी टी-20 / सायं. 7.30 वा. / कोलकाता
20 फेब्रुवारी / तिसरी टी-20 / सायं. 7.30 वा. / कोलकाता









