कोरोनामुळे घ्यावा लागला निर्णय
वृत्तसंस्था/ कराची
यजमान पाकिस्तान व विंडीज यांच्यात शनिवारपासून सुरू होणारी वनडे मालिका रद्द करण्यात आली आहे. विंडीज संघांतील काही खेळाडूंसह अन्य सदस्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱयांनी सांगितले.
पाकमध्ये दाखल झालेल्या विंडीज पथकातील तीन खेळाडूंसह पाच सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. चार सदस्यांना याआधीच लागण झाली होती. 2023 मध्ये होणाऱया विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याची ही वनडे मालिका असल्याने दोन्ही संघांसाठी ती महत्त्वाची होती. आता ही मालिका पुढील वर्षी जूनमध्ये घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. विंडीज संघात मर्यादित खेळाडू असल्याने त्यांना या मालिकेत खेळणे अडचणीचे ठरणार असल्याने हा निर्णय घेतला असल्याचेही पदाधिकाऱयांनी सांगितले. अशा स्थितीतही गुरुवारी विंडीजने शेवटचा टी-20 सामना पूर्ण केला. ही मालिका पाकने 3-0 अशी एकतर्फी जिंकली.
जे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले त्यात यष्टिरक्षक फलंदाज शाय होप, डावखुरा स्पिनर अकील हुसेन, अष्टपैलू जस्टिन ग्रीव्ह्ज यांचा समावेश आहे तर स्टाफमधील साहायक प्रशिक्षक रॉडी एस्टविक, फिजिशियन अक्षय मानसिंग यांचाही समावेश आहे. गेल्या शनिवारी डावखुरा स्पिनर शेल्डॉन कॉट्रेल, अष्टपैलू रॉस्टन चेस, काईल मेयर्स यांच्यासह काही पदाधिकारी पॉझिटिव्ह आढळले होते. या सर्वांना कराचीत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते मायदेशी परतणार आहेत.









