विमा कंपनीला दणका, मानसिक त्रासासाठी 10 हजार देण्याचे आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
कोणत्याही अपघातात वाहनाचे नुकसान झाल्यास विमा कंपनीने नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र बजाज फायनान्सने विम्याची रक्कम मंजूर करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ग्राहक न्यायालयात धाव घेण्यात आली. ग्राहक न्यायालयाने विमा कंपनी आणि फिर्यादीची बाजू ऐकून फिर्यादीदाराला 2 लाख 32 हजार 360 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मानसिक त्रास दिला म्हणून 10 हजार रुपये दंडही ठोठावला आहे.
निलजी येथील भरमा कल्लाप्पा पाटील यांची टोयाटो इटास क्रमांक केए 22 / 9574 हे वाहन मुंबई-गोवा रोडवर दि. 6 मार्च 2019 रोजी उलटले. यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भरमा यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला. मात्र वाहन चालविणाऱया चालकाचा परवाना चुकीचा असल्याचे कारण सांगत तो अर्ज फेटाळला.
त्यानंतर भरमा कल्लाप्पा पाटील यांनी त्याविरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी वादी-प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेतले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आदेशानुसारच बजाज कंपनीने फिर्यादीदाराला 2 लाख 32 हजार 360 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्राहकाला मानसिक त्रास दिल्याबद्दल ग्राहकाला ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष बी. व्ही. गुदली आणि सदस्य एस. एस. कादोळीमठ यांनी 10 हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत. फिर्यादीच्यावतीने ऍड. लक्ष्मण पाटील यांनी काम पाहिले.