प्रतिनिधी / वास्को
वास्कोतील शांतीनगर भागात मालवाहू रेलगाडीच्या धडकेमुळे पाच गुरांचा बळी गेला. तर एक वासरू गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ठार झालेली पाचही गुरे म्हशी असून जखमी वासराची प्रकृतीही चिंताजनक आहे. वासराला सोमवारी रात्री पिपल्स फॉर अनिमल्सच्या साहाय्याने केपे येथील ध्यान फाऊडेशनमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. सदर गुरे चिखलीतील एका कुटुंबाची असून चिखलीच्या पठारावरच एरव्ही चरणारी ही गुरे फिरत फिरत शांतीनगरातील रेलमार्गाजवळ पोहोचली होती. एकूण 14 गुरांपैकी 6 गुरे घरे न परतल्याने त्यांच्या मालकाने शोध सुरू केला असता त्याला या अपघाताची माहिती मिळाली. सोमवारी संध्याकाळी उशिरा एका मालवाहू रेलगाडीचा या गुरांना धक्का बसला. त्यात ही सर्व गुरे अवयव विखूरलेल्या अवस्थेत ठार झाली. या घटनेमुळे या रेल मार्गाच्या बाजुला राहणाऱया शांतीनगर व नवेवाडेतील राहिवासीयांचा गोंधळ व घबराट उडाली. स्थानिक नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन जखमी वासराच्या बचावासाठी उपाययोजना केली.
सदर मृत गुरांना वाहून नेणे शक्य नसल्याने मंगळवारी रात्री त्याच रेलमार्गाजवळ लोकांना विश्वासात घेऊन गुरांना दफन करण्यात आल्याची माहिती नगरसेवक कामुलेंकर यांनी दिली.
दरम्यान, ज्या ठिकाणी पाच गुरे ठार झाली तो रेलमार्ग अपघात प्रवण भाग असून मागच्या पंचवीस वर्षात या ठिकाणी अनेक व्यक्तींचा रेल्वेच्या धडकेने बळी गेलेला आहे.









