प्रतिनिधी /वास्को
वास्को पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱया दोघा युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 20 मोबाईल फोन जप्त केले. सदर मोबाईल फोन महागडे असून हे फोन या चोरटय़ांनी गोव्यात विविध ठिकाणी झालेल्या नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमात शिरकाव करून चोरल्याचा संशय आहे.
वास्को पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेऊन नंतर चोरी प्रकरणी अटक केलेल्या या चोरटय़ांची नावे अंशू शिबरटन व जुवेर शमीम अली अशी आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेश राज्यातील नागरिक असून नववर्षानिमित्त ते गोव्यात आलेले होते. रविवारी सकाळी सदर चोरटे बायणा भागात फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांना या युवकांबाबत संशय येताच त्यांनी त्या दोघा ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडे एकूण 20 महागडे मोबाईल असल्याचे आढळून आले. सदर फोन चोरीचे असल्याचे आढळून आल्याने पोलिसांना त्यांना अटक केली आहे. नवर्षानिमित्त गोव्यात विविध ठिकाणी झालेल्या बीच पाटर्य़ा तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये प्रवेश करून या चोरटय़ांनी सदर फोन चोरले असल्याचा संशय आहे. वास्कोचे पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रितेश तारी, गणेश मातोंडकर, स्वप्नील नाईक, उत्क्रांत देसाई, संतोष भाटकर, सचिन बांदेकर, गौरीश सातार्डेकर या पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.









