मुख्य निवडणूक अधिकाऱयासमोर आरोग्यमंत्र्यांची पोलखोल : भाजप प्रतिनिधीनेच पाडले उघडे
प्रतिनिधी /पणजी
अनेक मतदारसंघात मंत्री, आमदारांकडून स्वतःच्या मर्जीनुसार बीएलओंची नियुक्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी आतापर्यंत विरोधकांकडून करण्यात येत होत्या. मात्र आता भाजपच्याच एका प्रतिनिधी-पदाधिकाऱयाने वाळपई मतदारसंघातही असाच प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आणून देत खुद्द आरोग्यमंत्र्यांनाच उघडे पाडले आहे.
हा प्रकार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीतच उघडकीस आल्यामुळे त्याची नोंदवहीत अधिकृत नोंदही झाली आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी सर्वपक्षीय प्रतिनिधींची (त्रैमासिक) बैठक बोलावली होती. त्यावेळी काँग्रेसतर्फे आल्तिनो गोम्स, गोवा फॉरवर्डतर्फे दुर्गादास कामत, भाजपतर्फे पुंडलिक राऊत देसाई यांच्यासह अन्य पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी गोम्स व कामत यांनी मुरगाव मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या 29 पैकी 16 बीएलओ हे मंत्री मिलिंद नाईक यांच्या वीज खात्यातील कर्मचारी असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱयांच्या निदर्शनास आणले. सदर प्रश्नी तक्रार करून मोठा कालावधी उलटला तरीही निवडणूक कार्यालयाने कोणतीही कारवाई केली नसल्याची कैफियतही त्यांनी मांडली.
सदर तक्रारीस उत्तर देताना दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाच्या गंभीर काळात कोविड व्यवस्थापनासाठी बीएलओंची मदत घेण्यात आली होती. त्यामुळे त्यांची बदली करणे शक्य झाले नाही, असे सांगितले. सध्या जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे ते काम हाती घेण्यात आले असून बीएलओ होण्यास पात्र असलेल्या मतदारसंघातील सरकारी कर्मचाऱयांची निवड यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर कर्मचारी वीज खात्यातील नसतील याचीही दखल घेण्यात येईल, व शक्य तेवढय़ा लवकर सदर तक्रारीचे निवारण करण्यात येईल असे त्यांनी सदर प्रतिनिधींना सांगितले.
त्यावेळी बोलताना भाजप प्रतिनिधी श्री. देसाई यांनी बीएलओ हे अन्य खात्यांमधीलच असायला हवे या मागणीला सहमती दर्शविली. तसेच असाच प्रकार वाळपई मतदारसंघातही घडला असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले. वाळपई मतदारसंघातील बहुतेक बीएलओ हे आरोग्य खात्यातील कर्मचारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नियुक्त करण्यात येणारा प्रत्येक बीएलओ हा त्या त्या संबंधित मतदारसंघातीलच मतदार असावा याची निवडणूक अधिकाऱयांनी खात्री करावी, अशी सूचनाही देसाई यांनी केली.








