वाळपई/प्रतिनिधी :
जवाहर नवोदय विद्यालयाच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले होते. यासंदर्भात दुरुस्तीला काही प्रमाणात सुरुवात केली आहे. मात्र अनेक स्तरावर ही दुरुस्ती पूर्ण करण्याची गरज आहे. न्यायालयाचा आदेश असतानाही याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे मुलांना व शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कंत्राटदाराने दुरूस्ती पूर्ण करण्यापूर्वीच पलायन केल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. ही दुरुस्ती त्वरित पूर्ण न केल्यास पुन्हा एकदा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघातर्फे देण्यात आला आहे.
यासंदर्भाची निवेदने पालक शिक्षक संघातर्फे नवोदय विद्यालयाचे आयुक्त, गोवा सरकारचे जिल्हाधिकारी, सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी, शिक्षणखात्याचे संचालक, केंद्रीय आयुष्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना सादर करण्यात आलेली आहेत.
यासंदर्भाची माहिती अशी की वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना 1992 साली करण्यात आली. याठिकाणी नवोदय विद्यालयाच्या इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. सदर जागा एका खाजगी कुटुंबीयांची असल्याचा दावा करून हा वाद अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. सदर जमिनीवर वाद सुरू असल्यामुळे नवोदय विद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून वेळोवेळी या विद्यालयाच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या इमारतीची बकाल अवस्था व सदर ठिकाणी शिक्षण घेणाऱया मुलांसाठी मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण झाल्यानंतर पालक शिक्षक संघातर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार दि. 26 ऑगस्ट 2019 रोजी न्यायालयाने यासंदर्भात विशेष निर्देश देताना विद्यालयाच्या इमारतीचे विद्युतीकरण, गटार व्यवस्थेचे काम त्वरित हाती घ्यावे असे स्पष्ट केले होते. त्यानुसार उत्तरप्रदेश जल निगम या कॉन्ट्रक्टरकरवी या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. सदर जमिनीवर सुरू असलेला वाद न्यायप्रवि÷ बनल्याने सभोवताली कुंपणाच्या कामाव्यतिरिक्त इतर स्वरूपाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. मात्र सदर कामाला अपेक्षित गती प्राप्त झाली नाही. सध्यातरी कॉन्ट्रक्टरने या भागातून पलायन केल्यामुळे काम अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे येणाऱया काळात मुलांचे नियमित शिक्षणवर्ग सुरू झाल्यास विद्यार्थ्यांसाठी मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यासंदर्भात पालक-शिक्षक संघाच्या सभासदांची महत्त्वाची बैठक नुकतीच झाली व एकूण या परिस्थितीवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. सध्या विद्यालयाचे काम अर्धवट अवस्थेत असून यामुळे मुलांना निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गरज पडल्यास पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी यासंदर्भाची माहिती देणारी निवेदने वेगवेगळय़ा सरकारी खात्याला पाठविण्यात आली असून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निवेदनामध्ये अर्धवट अवस्थेत असलेली दुरूस्ती त्वरित पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे. अन्यथा पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावून एकूण परिस्थितीची न्यायालयाला जाणीव करून देण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.









