ऐन ऊसाच्या हंगामात पंप बिघडल्याचा परिणाम
प्रतिनिधी/ सांगे
जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या पुढाकाराने यंदा शेतीसाठी साळावली धरणातील पाण्याचा विसर्ग 15 नोव्हेंबरला सुरू करून पाणी कालव्यात सोडण्यात आले असले, तरी वालकिणी-सांगे येथील धरणग्रस्त वसाहतीमधील शेतीस पाणीपुरवठा करणाऱया दोन्ही ‘लिफ्ट इरिगेशन’ योजना 4 डिसेंबरला कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र सध्या वालकिणी वसाहत-3 येथील पाणीपुरवठा योजनेवरील पंप नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे, अशी माहिती मनोज पर्येकर यांनी दिली आहे.
वालकिणीतील धरणग्रस्तांच्या भागात दोन पाणीपुरवठा योजना आहेत. प्रत्येक योजनेवर एकूण तीन पंपांचे प्रयोजन असून दोन पंप एकावेळी चालू ठेवले जातात. पण वालकिणी वसाहत-3 येथील पंपात लगेच बिघाड झाल्याने आणि दुसरा पंप नसल्याने सध्या पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती पर्येकर यांनी दिली. जलस्रोत खात्याच्या या गलथान कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वालकिणी वसाहत-3 येथील योजना सुमारे 65, तर वसाहत-1 येथील योजना सुमारे 95 शेती भूखंडांना पाणीपुरवठा करते. या भागात ऊस आणि नारळ ही महत्त्वाची पिके असून सध्या ऊसाचा हंगाम सुरू आहे. ऊस तोडल्यानंतर लगेच पाणी देणे गरजेचे असते. खात्याने त्वरित पंप दुरुस्त करून योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे.