ऑनलाईन टीम / वाराणसी :
वाराणसीमधील डिझेल रेल्वे इंजिन कारखान्याला (डिरेका) बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या पोहचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिरेकाच्या शासकीय भवनातील औद्योगिक केंद्रात बुधवारी सकाळी साधारण सहा वाजण्याच्या आसपास हीl आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. त्यानंतर साधारण तीन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यास त्यांना सफलता मिळाली.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्य सुरक्षा अधिकारी नितीन मेहरोत्रा यांनी सांगितले की, सुरुवातीला ही आग फाईल ऑफिसकडे लागली होती. त्यानंतर ती पसरत पसरत औद्योगिक केंद्रापर्यंत पोहोचली. आग विझल्यावरनंतरच यात किती नुकसान झाले आहे याचा अंदाज येईल असे त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या मते, या आगीत करोडो रुपयांच्या कॉम्प्युटरचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. तसेच काम सुरू असताना आग लागली असती तर अजून मोठा अपघात झाला असता असेही त्यांनी यावेळी सांगितले.









