बाजारभोगाव / प्रतिनिधी
वारनूळ ( ता.पन्हाळा ) येथील एका अठरा वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा तरूण शिये (ता.करवीर) येथे आजोळी रहायला गेला होता. तिथे आजोबांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेला हा तरूण १० जुलै रोजी वारनूळ येथे आपल्या गावी आला होता.
त्याचे वडील गावचे उपसरपंच असून ते स्वतः या तरूणाला गावी घेवून आले आहेत. मात्र त्यांनी ही बाब लपवून ठेवली. १२ जुलै रोजी शिये येथील आजोबांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. वारनूळ येथे आलेल्या या तरूणाला ताप आल्याचेही लपवून ठेवण्यात आले. १२ जुलै रोजी हा तरूण कोरोनाबाधीत आजोबांच्या संपर्कात आल्याचे समजताच ग्रामपंचायत व दक्षता समितीने त्या रात्रीच त्याला सीपीआर रूग्णालयात दाखल केले. त्याची तपासणी करून स्वँब घेण्यात आला. कोल्हापूरात त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
त्याच्या सह वडीलांच्या संपर्कात आलेल्या अठरा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कुटुंबातील आठ जणांना पन्हाळा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. शेजारच्या घरातील दोघांना होम क्वारंटाईन करण्यात आहे आहेत. तर उपसरपंच वडीलांच्या संपर्कात आलेले सरपंचांचे पती , पाच ग्रामपंचायत सदस्य व दोन कर्मचाऱ्यांना तेथील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात आली असून दक्षता घेण्यात येत आहे.








