प्रतिनिधी / घुणकी
किणी ता हात कणंगले येथे वारणा काठच्या शेतात वावरणाऱ्या दोन वर्षांच्या मगरीच्या पिल्लाला येथील युवकांनी पकडून सुखरुपरित्या वनविभागाच्या हवाली केले.वारणा नदीपात्रात मगरींचा वावर वाढला असून त्यांची पैदासही मोठ्या प्रमाणात होत आहे. या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
वारणा नदीच्या काठी नेहमीच मगरी पहायला मिळतात पण गेल्या वर्षीपासून नदीकाठच्या शेतवाडीत अंडयातून मगरीची पिले बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत, गेल्या वर्षी घुणकी व चावरे येथे मगरीने पिलांना जन्म दिल्याचे स्पष्ट झाले आहे, गुरुवारी सकाळी प्रवीण हवालदार, अमर धनवडे, ऋतुराज पाटील आदी युवकांना अंदाजे दोन वर्षाचे मगरीचे पिल्लू आढळून आले, पिलांच्या संरक्षणासाठी मगरी सतत नदीकाठी फिरत असतात हे माहिती असल्याने या युवकांनी अंदाज घेत या पिलाला पकडत किणी गावात आणले.
याबाबत प्रा.राहुल नेजकर यांनी वनविभागाला कळविले वनविभागाचे कर्मचारी प्रदीप सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी किणी येथे येऊन त्या पिल्लाला ताब्यात घेतले, पिलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे डॉ. संतोष वाळवेकर यांनी दिली. यापूर्वी अनेकदा नदीकाठी मगरींचा वावर दिसल्यानंतर वनविभागाला कळवूनही मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. रात्री अपरात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतक-यांना जाता येत नाही. शेतात काम करणाऱ्या महिलांतही घबराट पसरली आहे.
Previous Articleहाथरस प्रकरण : पंढरपुरात राष्ट्रवादी युवतीचे बांगडी आंदोलन
Next Article मजगाव, स्टेशनरोड येथे मटका अड्डय़ांवर छापे









