ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यासही नकार दिला आहे. दरम्यान, आज त्यांना उपोषणस्थळी पाठिंबा देण्यास आलेल्या वारकऱ्यांसमोर संभाजीराजे भावूक झाले. त्यांच्या डोळय़ात अश्रू तरळले. त्यामुळे वारकऱ्यांसह कार्यकर्तेही हेलावून गेले. काही काळ परिसरात शांतता पसरली होती.
संभाजीराजे यांना काही वारकरी पाठिंबा द्यायला आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. यावेळी वारकऱ्यांनी अनेक अभंग सादर केले. त्यांचं कौतुक करताना संभाजीराजे भावूक झाले. त्यांच्या डोळय़ात अश्रू तरळले. संभाजीराजे म्हणाले, शिवाजी महाराजांनी भक्ती-शक्ती केल्यामुळे हे स्वराज उभं राहिलं आणि तो आशीर्वाद. तिचं ताकद देण्यासाठी आपण इथे आलात, मी मनापासून आपला ऋणी आहे. तुमची भक्ती आणि आमची शक्ती यांने स्वराज निर्माण होतं. आपण तेच स्वराज निर्माण करण्यासाठी आलात, तुम्हा सर्वाचं आभार, असं संभाजीराजे म्हणाले.
दरम्यान, संभाजीराजेंचा रक्तदाब आणि शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच तीव्र डोकेदुखीचाही त्यांना त्रास होत आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचे औषध घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. आज दुपारीच डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.